Gold Smuggling : 'पेस्ट' स्वरुपात सोन्याची तस्करी; नागपूर विमानतळावर 1.2 किलो सोनं जप्त
Nagpur Crime : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून आलेल्या प्रवाशांकडून 'पेस्ट' स्वरुपातील 68.60 लाख रुपये किमतीचे 1.236 किलो सोने जप्त केले.
Nagpur Crime News : कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr Babasaheb Ambedkar International Airport) मुंबईहून आलेल्या प्रवाशांकडून 'पेस्ट' स्वरुपातील 68.60 लाख रुपये किमतीचे 1.236 किलो सोने (smuggle gold) जप्त केले. विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली असून, आरोपीची चौकशी सुरु आहे.
अब्दुल रकीब (वय 25 वर्षे) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकचा, तर सध्या मीरा रोड, मुंबई येथील रहिवासी आहे. गो एअर कंपनीच्या जी 8-2601 विमानाने सकाळी 8.05 वाजता तो मुंबईहून नागपूरला आला होता.
तीन वेगवेगळ्या नावाचे आधार कार्ड
चौकशीदरम्यान त्याच्याकडे तीन नावाचे तीन आधार कार्ड आढळून आले. "सुरुवातीला सोने विदेशातून मुंबईत आले आणि तेथून मी नागपुरात आणले. नागपुरात एका व्यक्तीकडे सुपूर्द करणार होतो. मुंबईत सोने कुणी दिले आणि नागपुरात कुणाला द्यायचे होते, यांची नावे माहित नाही," असं आरोपीने चौकशीदरम्यान सांगितलं. केंद्रीय जीएसटी (Central GST) विभागाचे आयुक्त अभयकुमार म्हणाले, आरोपी नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान प्लास्टिकचे आवरण असलेले दोन पॅकेट अंतर्वस्त्रात लपवलेले आढळले. या दोन्ही पॅकेटमधील सोन्याचे एकूण वजन 1.236 किलो आहे.
दोन्ही क्रमांक स्विच ऑफ
त्याच्या मोबाईल फोनमध्ये सकाळी दोन कॉलची नोंद होती. एका तासानंतर त्याच्याच मोबाईलवरुन संबंधित क्रमांकावर फोन केला असता दोन्ही स्विच ऑफ होते. चौकशीनंतर त्याला विमानतळाबाहेर आणले पण त्याला भेटणारा कुणीही दिसला नाही. त्यामुळे त्याला चौकशीसाठी कस्टम कार्यालयात आणण्यात आले. तो तस्करीचा माल दुसऱ्यापर्यंत पोहोचून देणारा आहे. त्याला पहिल्यांदाच पकडण्यात आले आहे. कारवाईदरम्यान सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी मोलाची मदत केली.
आता देशातंर्गत सोन्याची तस्करी
आयातीत सोन्यावरील कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी आता विदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी देशांतर्गत विमान सेवेद्वारे होऊ लागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशातंर्गत विमानातील प्रवाशांवर विभाग लक्ष ठेवून आहे. कस्टम विभाग अर्थव्यवस्थेचा कणा असून, अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून विभाग दक्ष आहे. गेल्यावर्षी नागपूर विमानतळावर तीन घटनांमध्ये 5 कोटी किमतीचे जवळपास 10 किलो सोने पकडले होते. हे सोने रिझर्व्ह बँकेला विकण्यात आले आणि त्यातून मिळालेले 5 कोटी रुपये सरकारच्या खात्यात जमा करण्यात आले.
ही कारवाई केंद्रीय जीएसटी नागपूर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त रामचंद्र सांखला यांच्या नेतृत्वात आणि आयुक्त अभयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर कस्टम्सचे एअर इंटेलिजन्स युनिटचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी, अधीक्षक विजय सुंदर, दीपक सोनटक्के, अविनाश पराते यांनी केली.
ही बातमी देखील वाचा...