(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नागपुरात विष प्राशन करुन आत्महत्या
छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात संशयास्पद स्थितीत आत्महत्या केली आहे. राजेश श्रीवास्तव असे त्यांचे नाव असून ते छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागात सहायक संचालक पदावर कार्यरत होते
नागपूर : छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात संशयास्पद स्थितीत आत्महत्या केली आहे. राजेश श्रीवास्तव असे त्यांचे नाव असून ते छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागात सहायक संचालक पदावर कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी सेलफोस नावाचे विष प्राशन केले आहे नोकरीतील ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
राजेश श्रीवास्तव असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागाचे सहायक संचालक म्हणून काम पाहत होते. 1 मार्चला ते रायपूर मधील कोषागार संचालनालयातील त्यांच्या कार्यालयात गेले होते. तिथे साडे अकरा वाजता त्यांच्या पत्नीने त्यांना सोडले होते. मात्र, राजेश श्रीवास्तव तिथे जास्त वेळ थांबले नाही आणि अवघ्या दहा मिनिटांनी म्हणजेच अकरा वाजून चाळीस मिनिटांनी ते कोषागार सांचालनालयातून बाहेर पडले. मात्र, कोषागार संचालनालयात असतानाच्या दहा मिनिटांच्या कालावधीत ते वारंवार इकडे तिकडे फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत आणि मागे वळून वळून कोणाला तरी पाहत आहेत. रायपूरच्या कोषागार संचालनालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे
अकरा वाजून चाळीस मिनिटांनी राजेश श्रीवास्तव कोषागार संचालनालयात बाहेर पडल्यानंतर कुठे गेले हे कोणालाच माहीत नाही. संध्याकाळ पर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबीयांनी रायपूर पोलिसांकडे त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. इकडे नागपुरात 2 मार्चला राजेश श्रीवास्तव यांनी नागपूरच्या सीताबर्डी भागातील दुय्यम दर्जाच्या पूजा लॉज मध्ये 104 क्रमांकाची खोली घेतली. 2 मार्चला त्यांचे वर्तन सामान्य होते. 3 मार्चला सकाळी दहा वाजता ते लॉजच्या बाहेर ही गेले होते. थोड्याच वेळात परतले आणि नंतर संध्याकाळपर्यंत दार उघडले नाही. लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्यामुळे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.
पोलिसांनी जाऊन खोलीचे दार तोडून आत प्रवेश केले तेव्हा राजेश श्रीवास्तव मृतावस्थेत आढळले. पोलिसांना खोलीत सेलफोस नावाचे विषारी औषधाचे पाकीट मिळाले असून तेच प्राशन करून राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केयी असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, राजेश श्रीवास्तव गेले अनेक दिवस ताणतणावात होते. सुमारे एक वर्षांपूर्वी त्यांची अचानक बदली करण्यात आली होती. तेव्हा त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे साहित्य आणि फाईल्स कार्यालयाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून ते आपल्या बदली संदर्भात सरकार आणि प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढाई लढतच होते. शिवाय त्यांना गेल्या आठ महिन्यांपासून वेतन ही नियमित मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अंतर्मुख स्वभावाचे राजेश श्रीवास्तव आणखी निराश झाले होते. निर्व्यसनी आणि कामाच्या बाबतीत दक्ष अधिकारी अशी त्यांची छत्तीसगड प्रशासनात ओळख होती. मात्र, प्रशासनिक ताणतणाव आणि अपमानास्पद वागणुकीमुळे ते नैराश्यात जाऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.