आजवर समाजाने मला भरपूर दिलं, त्यामुळे साहित्य अकादमी पुरस्कार मी नाकारतो : नंदा खरे
उद्या ह्या कादंबरीसाठी जाहीर झालेला पुरस्कार लेखक नंदा खरे यांनी नाकारला आहे.
नागपूर : सन 2020 साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात प्रसिद्ध साहित्यिक नंदा खरे यांना 'उद्या' या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
आजवर समाजाने मला भरपूर दिले : नंदा खरे
आजवर समाजाने मला भरपूर दिले आहे, त्यामुळे मी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करत तो विनम्रतेने नाकारतो आहे, असे मत व्यक्त करत आपल्या "उद्या" या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या नंदा खरे यांनी पुरस्कारासाठी धन्यवाद दिले आहेत. उद्या ही कादंबरी मोठ्या शहरातील आधुनिक जगात जगणाऱ्या पात्रांपासून अगदी गडचिरोलीतील आदिवासी भागात जगणाऱ्या गरीब पात्रांच्या जीवनाचा वेध घेणारी कादंबरी आहे.
यापुढेही लेखन करत राहणार, खासकरून कोरोना काळात जेव्हा जगातील बहुतांशी जनता हाल सहन करत होती. तेव्हा काही मोजक्या अब्जाधीशांची संपत्ती कित्येक पटींनी वाढली आहे. हे आधुनिक बाजार व्यवस्थेत कसे काय घडते याचा वेध घेत या नव्या बाजार व्यवस्थेचे विविध पैलू समोर आणण्याचे प्रयत्न आपल्या लेखनातून करणार असल्याचे नंदा खरे म्हणाले.
नंदा खरे हे स्थापत्य अभियंते असून ते विदर्भातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राहिले आहे. बांधकाम क्षेत्रात कार्यरत राहतानाच त्यांनी लेखन कार्य सुरू केले होते आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी बांधकाम क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर पूर्णवेळ लेखन कार्याला दिले. विज्ञान, भूशास्त्र सारख्या विषयांवर अनेक पुस्तके लिहिल्यानंतर 2012 पासून नंदा खरे यांनी उद्या ही कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये "उद्या" ही कादंबरी प्रकाशित झाली आणि आज त्याच पुस्तकासाठी नंदा खरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.