Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा, विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॅाच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री होताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भातील वाळू माफियांना इशारा दिलाय.
नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे राज्याच्या महसूलमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू माफियांना इशारा दिला. जनतेसाठी त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू, अशी घोषणा त्यांनी केली.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर विदर्भातील वाळू माफीयांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे चित्र आहे. भंडारा, गोंदिया, ब्रम्हपूरी, वरोरा, नागपूर, वर्धा, गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होते. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर महसूल विभागाच्या (Revenue Department) रडारवर वाळू तस्कर आले आहे. आता अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई होणार आहे. यामुळे वाहू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खाते मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जनतेसाठी त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू. जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल, असं सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू. महसूल विभागामुळं जनतेला त्रास होत आहे. हे मी पाहू शकत नाही. देशातील सर्वात चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल अशी ओळख मी निर्माण करेन, असे त्यांनी म्हटले. तर राज्यात सुमारे 86 हजार हेक्टर झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळं अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. या जमिनी प्रामुख्यानं विदर्भात अधिक असून, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. या खटल्याच्या बाबतीत न्यायालयात पाठपुरावा करून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्रिपदावरून वाद होणार नाही
दरम्यान, महायुतीत खातेवाटप जाहीर झाल्यानंतर पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. 12 जिल्ह्यात मंत्री नसले तरी, ज्या पद्धतीने खातेवाटप पार पडले आहे, त्याच पद्धतीने पालकमंत्रीपदाचे वाटप होईल, त्यात वाद होणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
आणखी वाचा