नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा; सरकारकडून 10 हजार कोटींपैकी 2289 कोटी वितरित
दिवाळीआधी आज 2 हजार 289 कोटी देत असलो तरी दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे उर्वरित पैसे देऊ. संपूर्ण नुकसानभरपाई दिवाळी आधी देण्याची आमची तयारी होती, मात्र अचानक निवडणूक जाहीर झाली, त्यामुळे काही अडचण निर्माण झाली.
नागपूर : सरकारी मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश आज काढण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल असे जाहीर केले होते.
आज निवडणूक आयोगाने पत्र पाठवून मदत वाटपाबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जो 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे, त्यापैकी आज 2 हजार 289 कोटी वितरित करण्यात आले आहेत. हा सर्व निधी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यासाठीच द्यावा अशी सूचना दिली आहे, असं मदन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
दिवाळीआधी आज 2 हजार 289 कोटी देत असलो तरी दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे उर्वरित पैसे देऊ. संपूर्ण नुकसानभरपाई दिवाळी आधी देण्याची आमची तयारी होती, मात्र अचानक निवडणूक जाहीर झाली, त्यामुळे काही अडचण निर्माण झाली. मात्र, आम्ही निवडणूक आयोगाची विशेष परवानगी मागून ही मदत देत आहोत. काल काही बातम्यांमध्ये विदर्भाच्या वाट्याला अवघे 8 कोटी असा उल्लेख होता, त्यात तथ्य नाही. उलट विदर्भाला 566 कोटींचा निधी देणार आहोत, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान संदर्भात एकूण 4 हजार 700 कोटी देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
सरकारी मदतीची विभागवार माहिती
विदर्भ - 566 कोटी मराठवाडा - 2 हजार 639 कोटी उत्तर महाराष्ट्र - 450 कोटी पश्चिम महाराष्ट्र- 721 कोटी कोकण - 104 कोटी
या 4 हजार 700 कोटींपैकी आज 2 हजार 289 कोटी वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या असा रोजच गळा काढणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्राकडे अतिरिक्त मदतीसाठी किमान साधं पत्र तरी लिहावं, असा टोलाही त्यांनी लगावला. आज जे 2 हजार 289 कोटी रुपये सरकार देत आहे, ते जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा होतील. त्यानंतर ते बँकांकडे जाईल. बँकांना शेतकऱ्यांच्या याद्या तयार ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या