MNS Vidarbha : राज ठाकरे तब्बल 6 दिवस विदर्भ दौऱ्यावर, महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात आखणार रणनिती
ज्या भागांत शिवसेनेचे प्राबल्य आहे, अशा भागांत मनसेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोनचार टक्के मतांचे विभाजन झाले तरी भाजप-मनसे युतीचा उद्देश साध्य होणार असल्याची चर्चा आहे.
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा अखेर ठरला. 17 सप्टेंबरला सायंकाळी रेल्वेने ते नागपूरसाठी (Nagpur) प्रयाण करतील आणि 18ला सकाळी त्यांचे नागपुरात आगमन होईल. त्यानंतर तब्बल सहा दिवस म्हणजे 23 तारखेपर्यंत ते विदर्भात असणार आहेत. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे. तसेच आगामी निवडणूकीसाठी रणनिती ठरवणार असल्याची माहिती आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पक्ष संघटन वाढविणे, हादेखील या दौऱ्यामागील उद्देश आहे. या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर व अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी महानगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.
दोन दिवस नागपुरात
नागपुरात 18 व 19 सप्टेंबर असे दोन दिवस त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर 20 सप्टेंबरला ते नागपूरवरून चंद्रपूरकरीता (Chandrapur) रवाना होतील. चंद्रपूर येथेही ते मुक्कामी असतील. 21 सप्टेंबरला ते चंद्रपूरवरून अमरावतीसाठी रवाना होतील. 21 व 22 सप्टेंबर रोजी ते अमरावती (Amravati) येथे थांबून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते 23 सप्टेंबरला अमरावती येथून मुंबईकडे प्रयाण करतील. तत्पूर्वी राज ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी 13 सप्टेंबरला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, अविनाश जाधव, आनंद एम्बडवार, बबलू पाटील, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर अशा पाच जणांची चमू नागपूर येथे तिन्ही जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करणार आहेत.
शहरात फक्त कॉंग्रेस अन् भाजपाच
नागपूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही. सेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे. त्यामुळे काँग्रेस दीडशे पैकी पन्नास जागाही सोडायला तयार नाही. त्यांची ताकद वाढवून आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा नाही, असे येथील स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. हे जरी खरे असले तरी महाविकास आघाडी (MVA) एकत्रित लढल्यास बऱ्यापैकी भाजपला रोखण्यात यश येऊ शकते, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळेवर वरिष्ठांकडून दबाव आल्यास आघाडी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे सर्वांचेच म्हणणे आहे. त्यामुळे भाजप सावध आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी (INC NCP) एकत्रित लढण्यास भाजपला त्याचा फारसा त्रास होणार नाही.
शिवसेनेची करणार कोंडी
कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची ताकद वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन व्हावे, याकरिता भाजपचीही गुप्त तयारी सुरू आहे. ज्या भागांत शिवसेनेचे प्राबल्य आहे, अशा भागांत मनसेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोनचार टक्के मतांचे विभाजन झाले तरी भाजप-मनसे युतीचा उद्देश साध्य होणार आहे. नवे राजकीय समीकरण तयार झाल्यास नागपूर महापालिकेत मनसेचे खाते पुन्हा उघडू शकते. याचा फायदा मनसेला चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांमध्येही (Amravati Mahanagar Palika) होऊ शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या