Azadi Ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्य दिनी 90 हजारांवर प्रवाशांची मेट्रो 'राईड'
आझादी का अमृत महोत्सव प्रदर्शन ठरतोय आकर्षणाचे केंद्र. ही ऐतिहासिक आणि विक्रमी रायडरशिप निश्चितपणे मेट्रो ट्रेनमधील प्रवासीसंख्या आणखी वाढविण्यात मदत करणार असल्याचा विश्वास मेट्रोने व्यक्त केला.
नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नागपूरकरांनी उत्साहात साजरा केला. शहरातील सर्वच उद्याने, तलाव आणि फिरण्याचे इतर ठिकाणे काल हाऊसफुल्ल पाहायला मिळाले. यातच नागपूर मेट्रोने दिवसभरात 90 हजार 758 प्रवाशांनी प्रवास केल्याची आकडेवारी महामेट्रोने जारी केली आहे. यापूर्वी सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद 26 जून रोजी करण्यात आली होती. 26 जून 66,248 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. यानुसार 15 ऑगस्ट रोजी रायडरशिप 26 जानेवारी २०२२ च्या तुलनेत 24,330 जास्त होती हे विशेष.
उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रो नागपूरच्या प्रवासी संख्येत सतत वाढ होत असून प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी 2021) रोजी महा मेट्रोने 56406 प्रवाश्यानी मेट्रोने प्रवास केला होता. 26 जानेवारीची रायडरशिप नियमित आठवड्याच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येशी जुळते. ही स्थिर आणि निश्चित वाढ नागपूरकरांच्या सहकार्यामुळे शक्य झाली आहे.
लवकरच 1.5 लाख प्रवाशांचा टप्पा गाठणार
महा मेट्रोने 1 लाखा पर्यंत गाठलेला हा आकडा उर्वरित 2 मार्ग (कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन) आणि (सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन) कार्यान्वित झाल्यानंतर ते 1.5 लाखाचा टप्पा सहज पार करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. महा मेट्रोने मेट्रो स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या असून यात फीडर सेवा, महा कार्ड आणि मोबाइल ऍप, ट्रेनच्या वेळेत वाढ करणे इत्यादीसारख्या सुविधांचा समावेश आहे. आता पर्यंतच्या सर्वाधिक रायडर्सशिपचा ट्रेंड सकाळ पासूनच जाणवू लागला आणि दिवसभर यामध्ये बदल होत गेले. सकाळ पासूनच मेट्रो स्थानकांवर मेट्रो प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती. दिवसभर पाऊस पडत असला तरी, नागपूरकरांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली.
सीआरपीएफ बँड, फ्लॅश मॉबचा माहौल
सुट्टीचा दिवस असल्याने सर्व मेट्रो स्थानके प्रवाशांनी भरली होती. विक्रमी रायडरशिपच्या अपेक्षे प्रमाणे महा मेट्रोने सर्व मेट्रो स्थानकांवर आवश्यक व्यवस्था केल्या होत्या. गेल्या काही काळापासूनचा ट्रेंड बघता, महा मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या बाबींचा विचार करून आणि प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन, वाढलेल्या प्रवाशांना हाताळण्यासाठी महा मेट्रोने सर्व स्तरांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात केले होते. मेट्रो स्थानकांवर, विशेषत: सिताबर्डी इंटरचेंज मोठ्या प्रमाणात लांब रांग बघायला मिळाली. प्रवाशांनी सकाळपासूनच मेट्रो राइडसाठी तिकीट खरेदीसाठी रांग लावली होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूरकरांनी मेट्रो स्थानकांवर गर्दी केल्याने प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. स्वतंत्रता दिवस साजरा करण्यासाठी महा मेट्रोने विविध मेट्रो स्थानकांवर चित्रकला स्पर्धा, संगीत कार्यक्रम, सीआरपीएफ बँड, फ्लॅश मॉब यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शन ठरतोय आकर्षणाचे केंद्र
सिताबर्डी इंटरचेंज येथे 'महा मेट्रो आणि केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आझादी का अमृत महोत्सव वरील प्रदर्शन हे प्रवाशांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. ही ऐतिहासिक आणि विक्रमी रायडरशिप निश्चितपणे मेट्रो ट्रेनमधील प्रवासीसंख्या आणखी वाढविण्यात मदत करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.