OBC Reservation : 'ओबीसी आरक्षणाला कोणाचा धक्का लागू देणार नाही आणि वाटेकरी देखील होऊ देणार नाही', फडणवीस थेटच म्हणाले...
OBC Reservation : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील ओबीसी समाजाच्या आंदोलानाला भेट दिली असून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं आहे. आरक्षणसाठी मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर ओबीसी समाजाने आंदोलन पुकारले आहे. त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये ओबीसी समाजाकडून आंदोलन (OBC Protest) देखील करण्यात आले. तसेच हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, ओबीसी समाजाचं आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही. तर या आरक्षणावर कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही.
मागील सात दिवसांपासून ओबीसी समाजाकडून राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनकर्त्यांची देखील भेट घेतली. तसेच त्या आंदोलनकर्त्यांना देखील आंदोलन मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. फडणवीसांनी पुढे बोलतांना म्हटलं की, 'माझ्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये मराठा समाजाला जे 12 टक्के आणि 13 टक्के मिळालं होतं ते आरक्षण परत मिळावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भात क्युरिटी पिटिशनची तयारी देखील करण्यात येत आहे.'
'वेगळं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न'
पुढे बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की, 'मनोज जरांगे यांनी जो सरसकट शब्द टाकण्याची मागणी केली तो शब्द टाकता येणार नाही. असं आरक्षण न्यायालयात देखील टिकणार नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याही समाजाची फसवणूक करायची नाही. म्हणून मी ओबीसी समाजाला आश्वस्त करतो कि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही'
लवकरच ओबीसी वसतिगृह तयार करु - फडणवीस
'राज्यात लवकरच ओबीसी समाजाची वसतिगृहे सुरु होणार असल्याची माहिती देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. त्यासाठी अर्थ मंत्रालयाची देखील परवानगी मिळाली असून राज्यात 72 ओबीसी वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दहा लाख घरांची तरतूद ही ओबीसी समाजासाठी करण्यात आली असून त्यातील तीन लाख घरांचे बांधकाम सुरु केले जाणार आहे', असं फडणवीसांनी म्हटलं.
'कंत्राटी भरतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये'
कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर देखील फडणवीसांनी यावेळी भाष्य केलं. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, सरकारच्या आस्थापन जागेवर कोणतीही कंत्राटी भरती होणार नाही. कंत्राटी भरती या अफवांवर विश्वास ठेवू नये. तर वर्षात 75 हजार नाही तर दीड लाख नोकरभरती करण्याची घोषणा देखील फडणवीसांनी केली आहे. तसचे लवकरच ओबीसी शिष्टमंडळाला चर्चेला बोलवण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.