नोकरी देताना कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या उद्योगांवर कारवाई : उदय सामंत
कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये असा इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
नागपूर : कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार असून त्यात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं शक्य नाही, असा पवित्रा राज्य सरकारने घेतला होता. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सोप्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार असून त्यासाठी नियोजनही करण्यात आलं आहे. अशातच अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही हा प्रश्न उद्भवल्यापासून कोरोना काळात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव तर होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातही भीती निर्माण झाली होती.
विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, 'कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार असून त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये.' तसेच 'जर कोणत्याही उद्योग समूहाने किंवा कंपनीने कोरोना वर्षात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देताना ते कोरोना वर्षातील उत्तीर्ण असल्याने निवडीच्या प्रक्रियेत भेदाभेद केले, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या उद्योग, व्यवसायांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे विविध विद्यापीठांनी आखलेल्या नियोजनानुसार, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त परीक्षा द्यावी.' असंही उदय सामंत म्हणाले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थिगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियांमध्ये आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात बोलताना उदय सांमंत म्हणाले की, 'मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील महाविद्यालयात सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेबद्दल एका आठवड्यात स्पष्टता आणली जाईल.' तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेल्या आणि नंतर लगेच परत घेतलेल्या आदेशाबद्दल बोलताना, 'ती माझ्या विभागाची चूक होती.', असं सामंत म्हणाले. तसेच चूक लक्षात आल्यावर आदेश परत घेतल्याची कबुलीही उदय सामंत यांनी यावेळी दिली.
राज्याच्या विविध विद्यापीठांमध्ये अनेक पद रिक्त असून सध्या फक्त कोरोना संकटामुळे नवीन भर्तीवर स्थगिती आणली गेली आहे. मात्र, कोरोना संकटानंतर ती स्थगिती मागे घेतली जाईल आणि विद्यापीठांना आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाने अचूक नियोजन केले असून तब्ब्ल 7 लाख 92 हजार विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे सामंत म्हणाले. दरम्यान, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील एक ते दीड महिन्यात पुन्हा परीक्षा घेऊ अशी हमी देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
- सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्यपाल सकारात्मक : उदय सामंत
- विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरुंचं एकमत : उदय सामंत
- मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षांसंदर्भात मत विचारावं : उदय सामंत
- UGC Exams Final Verdict: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय