मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
राज ठाकरे आगामी प्रचार संभांमधून कॉल रेकॉर्ड आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत.

मुंबई : राज्यात भाजप शिवसेना महायुतीकडून सुरू असलेल्या बिनविरोध निवडणुकांचा (Election) पॅटर्न लोकशाहीसाठी घातक असून विरोधकांनी एकत्र येत आवाज उठवायला सुरु केली आहे. ठाणे, कल्याण डोंबिवलीसह राज्यात निवडून आलेल्या 70 बिनविरोध निवडून उमेदवारांची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये, सर्वाधिक भाजपचेच (BJP) आहेत. दबाव, पैशाचं आमिष दाखवून उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे ठाण्यात मनसेच्या एका उमेदवारानेही निवडणुकीतून माघार घेतल्याने मनसैनिकांना हा मोठा धक्का होता, त्यामुळे बिनविरोध झालेले हे उमेदवार कसे निवडून आले आहेत? याची पोलखोल येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे (Raj Thackeray) करणार आहेत.
राज ठाकरे आगामी प्रचार संभांमधून कॉल रेकॉर्ड आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत. कारण, राज ठाकरे यांच्याकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवलतील नेत्यांनी हे पुरावे सुपूर्द केले असल्याची माहिती आहे. तसेच, महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या प्रकरणी राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आक्रमक झाली आहे. या सगळ्याप्रकरणी येत्या सोमवारी मनसे बिनविरोध उमेदवार आणि त्यांच्या जागांबाबत कोर्टात जाणार आहे. तसेच सोमवारी या सगळ्या प्रकरणी मनसेचे प्रमुख नेते राज्य निवडणूक आयुक्तांची भेटही घेणार आहेत.
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्यास अवघे 12 दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला 13 दिवस बाकी आहेत. मात्र, या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 70 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामध्ये भाजपाचे सर्वाधिक 44 बिनविरोध नगरसेवक भाजपचे आहेत. दरम्यान, याच बिनविरोध विजयी नगरसेवकांबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात खंत व्यक्त केली आहे. माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी मी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जी इतक्या उमेदवारांना बिनविरोध करते. ही परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय, असं राज ठाकरे म्हणाले. ठाण्याचे शहराध्यक्ष अविनाश जाधव , अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. या भेटीदरम्यान, राज ठाकरेंनी बिनविरोध निवडीवरुन हे वक्तव्य केलं आहे.
राज्यातील बिनविरोध उमेदवार कोणत्य पक्षाचे, किती?
भाजपाचे 44
शिवसेना शिंदे गट 22
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2
इस्लामिक पार्टी- 1
आणि अपक्ष 1
हेही वाचा
महाराष्ट्रात 70 उमेदवार बिनविरोध; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी माझ्या...




















