नागपुरात दुपारी 12 ते 4 पर्यंत ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार, वाढत्या उन्हामुळे वाहतूक शाखेचा निर्णय
नागपूरमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत ट्रॅफिकची सिग्नल यंत्रणा बंद राहणार आहे. मात्र सरसकट शहरातील सगळ्या सिग्नलसाठी हा नियम लागू नाही.
नागपूर : राज्यभरात उन्हाचा पार सातत्याने वाढत आहे. राज्यभर उन्हाच्या झळा जाणवत असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं कठीण होऊन बसलं आहे. या उन्हाचे एवढे वेगवेगळे परिणाम दिसत आहे की त्यावर विश्वास बसणं कठीण व्हावं. नागपूरमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत ट्रॅफिकची सिग्नल यंत्रणा बंद राहणार आहे. उन्हाचा होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सरसकट शहरातील सगळ्या सिग्नलसाठी हा नियम लागू नाही.
वाहतूक सुरु असताना सिग्नलवर थांबून होणारा उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून नागपूरच्या वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे. शहरामधली ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहे. नागपूरमधील वाहनचालकांसाठी हा मोठा दिलासादायक आणि संवदेनशील निर्णय आहे.
उन्हामुळे लाही लाही होत आहे. त्यातच नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंशांच्या पार गेलं आहे. उन्हाच्या झळा आणि नागपूर शहरातील वाहतुकीचं प्लॅनिंग पाहिलं तर कधी कधी 30 ते 40 सेकंदांपेक्षा जास्त सिग्नल असतो. उन्हामुळे महत्त्वाचं काम असेल तरच लोक घराबाहेर पडतात. त्यात वाहनं चालवणाऱ्यांची संख्या तुरळक असते. त्यातच सिग्नल लागल्यावर तिथे थांबण्याचा कालावधी बऱ्याचदा जास्त असतो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी पहिली यादी काढली आहे आणि दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत बंद सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान शहरातील सगळ्या सिग्नलसाठी हा सरसकट नियम लागू होणाप नाही. मात्र ज्या ठिकाणी नियंत्रण न ठेवता वाहतुकीला अडचण होणार नाही, असे सिग्नल पहिल्या टप्प्यात निवडण्यात आले आहेत. तिथे चार तास सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक शाखेच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या