मुलाच्या हातात मोबाईल देणं नागपूरमधील दाम्पत्याला महागात, अकाऊंटमधून 8 लाख 95 हजार रुपये लंपास
मुलाच्या हातात मोबाईल देणं नागपूरच्या दाम्पत्याला महागात पडलं आहे. कारण 'फोन पे' अॅपची ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुलाने चुकीच्या लिंकवर क्लिक केलं आणि घात झाला. सायबर गुन्हेगारांनी अकाऊंटमधून तब्बल 8 लाख 95 हजार रुपये लंपास केले. त्यामुळे घरासाठी काढलेलं कर्ज गमावण्याची वेळ या दाम्पत्यावर आली आहे.
नागपूर : जर तुमच्या मोबाईलमध्ये आर्थिक व्यवहार करणारे अॅप आहेत आणि तुमचे बँक खाते त्या अॅपशी जोडलेले आहे. तर तुमचा मोबाईल तुमच्या मुलांच्या हातात देताना दहा वेळा विचार करा. कारण नागपुरात एका कुटुंबाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. पंधरा वर्षीय मुलाने वडिलांच्या मोबाईल फोनमधील 'फोन पे' अॅपची ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याचा प्रयत्न केला आणि गुगलवरुन 'फोन पे' अॅपची चुकीची लिंक वापरल्यामुळे तो ऑनलाईन ठकांच्या जाळ्यात अडकला. चाणाक्ष ठकांनी त्याच्या वडिलांच्या अकाऊंटमधून तब्बल 8 लाख 95 हजार रुपये लंपास केले.
नागपूरच्या मनघटे कुटुंबियांनी घराचे बांधकाम करण्यासाठी काढलेल्या गृह कर्जाचे 8 लाख 95 हजार रुपये ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या ठकांच्या हाती गमावले आहे. अशोक मनघटे हे वीज मंडळाचे कर्मचारी असून घराचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी नुकतेच कर्ज काढले होते. दिवाळी पूर्वी त्यांचा मुलगा धीरजला एका मोबाईल अॅमार्फत पैशांचे काही व्यवहार करायचे होते. त्याकरिता त्याने 'फोन पे' अॅपचा कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च केला. गुगल सर्चवर फोन पे अॅपच्या कस्टमर केअरचा नंबर दाखवणारी एक लिंक त्याला दिसली (ऑनलाईन ठकांनी तयार केलेली खोटी लिंक). धीरजने तिथे नमूद केलेल्या नंबरवर फोन केले असता समोरुन एकाने त्याला 'फोन पे'च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवले. चाणाक्ष ठकबाजाने धीरजकडून विविध माहिती घेतली. त्यानंतर ठगबाजाने धीरजकडून एक वेगळं अॅप मोबईलमध्ये इन्स्टॉल करुन घेतलं. धीरजने ते अॅप डाऊनलोड करताच धीरजच्या हातातल्या मोबाईलची सूत्रे त्या चोरट्यांकडे गेली. त्यानंतर धीरजच्या वडिलांच्या अकाऊंटमधून चोरट्यांनी एकापाठोपाठ एक ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये वळते करणे सुरु केले.
मध्य रात्रीच्या सुमारास झालेल्या या प्रकाराने 15 वर्षीय धीरज घाबरला. त्याने वडिलांना त्याची कल्पना दिली. त्यांनी लगेच एटीएम कार्ड ब्लॉक केले. मात्र, त्यानंतर ही डोळ्यादेखत आणखी 7 लाख म्हणजेच एकूण 8 लाख 95 हजार रुपये ऑनलाईन ठकबाजी करणाऱ्या चोरट्यांच्या अकाऊंटमध्ये गेले. गृह कर्जाचे पैसे असे ठकबाजाने ऑनलाईन पळवल्यामुळे सरकारी कर्मचारी असलेले अशोक मनघटे हवालदिल झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी रीतसर तक्रार नोंदवली असून तपास सुरु केला आहे. मात्र, आर्थिक व्यवहार करणारे अॅप मुलांच्या हाती सोपवू नका. शक्यतो आर्थिक व्यवहाराचे अॅप असलेले मोबाईल मुलांपासून दूर ठेवा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
अशोक मनघटे यांनी घराच्या बांधकामासाठी चार दिवसांपूर्वीच गृहकर्ज घेतले होते. त्याच पैशावर त्यांचे स्वप्न अवलंबित होते. आता घराची बांधणी तर दूर कर्जाचे पैसे कसे चुकवावे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार किती सावधगिरीने करणे गरजेचे आहे हे अधोरेखित झालेच आहे. शिवाय लहान मुलांनी आम्हाला सर्व काही समजते या अविर्भावात पालकांच्या मोबाईलवरुन व्यवहार केल्याची किती मोठी किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते हे ही या प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.