Nagpur Crime News : नागपुरात कचऱ्यात आढळलेले 'ते' भ्रूण आलं कुठून? पोलिसांनी घेतला शोध
Nagpur News: नागपूरमधील क्वेटा कॉलनीतील कचऱ्यात आढळलेल्या भ्रूणाबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Nagpur News : क्वेटा कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आलेले सहा भ्रूण कुठून आले, याचा शोध पोलिसांनी घेतला आहे. कचऱ्यातील हे सहा भ्रूण पुरोहित नर्सिंग होममधील असल्याचे समोर आले आहे. पाच ते सहा अर्भक कचऱ्यात फेकल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
सन 2016 मध्ये पुरोहित नर्सिंग होमच्या संचालिका असलेल्या महिला डॉक्टरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे नर्सिंग होम बंद होते. नुकतंच नर्सिंग होमचे नुतनीकरण सुरू करण्यात आले. या दरम्यान तिथे साफसफाई सुरू करण्यात आली होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी नर्सिंग होम मधील एका बंद खोलीतील भंगार एका भंगारवाल्याला नेण्यास सांगितले. भंगारवाल्याने भंगार उचलताना नर्सिंग होम मध्ये एका बॉक्समध्ये जपून ठेवलेले भ्रूण ही उचलले. हे भ्रूण काही कामाचे नसल्याचे वाटल्याने कचऱ्यात फेकून देण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरोहित नर्सिंग होमच्या तत्कालीन संचालक असलेल्या महिला डॉक्टर प्रशिक्षक डॉक्टर्सना शिकवत होत्या. त्यासाठी त्यांनी काही भ्रूण प्रीझर्व्ह करून ठेवले होते. तेच भ्रूण क्वेटा कॉलोनी मध्ये कचर्याच्या ढिगार्यात सापडले असे आतापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आले आहे. दरम्यान, पोलीस अजूनही याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
बुधवारी, दुपारी चारच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी सर्वात पहिल्यांदा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बायोमेडिकल वेस्टसह तीन विकसित तर इतर अविकसित भ्रूण पाहिले होते. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याठिकाणी सुमारे सहा भ्रूण, काही हाडे आणि इतर मानवी अवयव पाहिल्यानंतर फॉरेन्सिक टीम आणि डॉक्टरांना बोलवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वी मधील कदम हॉस्पिटलच्या आवारात ही अनेक भ्रूण आणि हाडे सापडल्याने खळबळ उडाली होती.
इतर बातम्या:
- Crime News : अपहरण झालेल्या लहानगीची 24 तासात सुखरुप सुटका; आरोपीला चार दिवसात शिक्षा
- सोशल मीडियावरील चॅटवरून वाद पेटला; दोन तरुणांचा खून, एक गंभीर जखमी, जत तालुक्यातील घटना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha