Padmashri Awards 2024 : न्यूरोलॉजिस्ट डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री जाहीर; 36 वर्षांच्या अविरत सेवेचा सन्मान
Dr. Chandrashekhar Meshra : नागपूरचे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना भारत सरकारने पद्मश्री जाहीर केला आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.
नागपूर: नागपूरचे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम (Dr. Chandrashekhar Meshram) यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार (Padmashri Awards 2024) जाहीर केला आहे. गेल्या तीन दशकांहून आधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना या सन्मानेने सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात खास करून मेंदूशी संबंधित रुग्णांसाठी काम करताना मेश्राम यांनी त्यांच्यावर केवळ उपचारच केले नाही, तर त्यांचा योग्य आणि आवश्यक मार्गदर्शनही केलंय. त्यासंदर्भात माझ्या कामाचा भारत सरकारने गौरव केल्याबद्दल सरकारचे, समाजाचे आभार असल्याची भावना डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.
सध्याच्या काळात आणि सतत होत असलेल्या आधुनिकीकरणात शारीरिक आरोग्यसह मानसिक आरोग्य ही तेवढाच महत्त्वाचा आहे. गेले अनेक वर्ष लोकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मेंदू संबंधी रोगांबद्दल जनजागृतीसाठी सतत कार्य केले असून भविष्यात आणखी जोमाने हे काम करणार असल्याची ग्वाही देखील पद्मश्री डॉ. मेश्राम यांनी दिली.
123 देशात भारताचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले असून एकूण 110 जणांचा गौरव करण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्रीने सन्मानीत करण्यात आले असून त्यामध्ये नागपुरातील ख्यातनाम न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा देखील समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून 36 वर्षांच्या अविरत वैद्यकीय आणि सामाजिक सेवेसाठी मिळालेल्या या सन्मानाबद्दल सरकारचे आणि समाजाचे आभार असल्याची भावना डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी या 123 देशांचे सदस्य असलेल्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागाचे डॉ. मेश्राम हे 2017 पासून अध्यक्ष आणि 2022 पासून संघटनेचे विश्वस्त म्हणून निवडले गेले आहे. ही उपलब्धी मिळविणारे ते पहिले भारतीय डॉक्टर ठरले आहेत. त्यामुळे डॉ. मेश्राम यांच्या कर्तृत्व आणि कौशल्याचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी मेंदूच्या आरोग्याविषयी जागरुकता, नागरिकांना न्यूरोलॉजिकल रोगांबद्दल ज्ञान देऊन सक्षम बनवण्याच्या देशव्यापी मोहिमेचे नेतृत्व केले. इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे अध्यक्ष आणि सचिव राहिलेल्या डॉ. मेश्राम यांनी सार्वजनिक आरोग्य शिक्षणात राष्ट्रीय नेतृत्व प्रस्थापित केले. आरोग्यापलीकडे सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग असून नागपुरात 6 वेळा ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांचे वडील महादेव मेश्राम यांच्याकडून लोकसेवेच हा वारसा मिळाला असून त्यांच्या वडिलांना देखील राष्ट्रपतींकडून वयोवृद्ध लोकांच्या सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे. वडिलांच्या प्रेरणेतून त्यांनी हा लोकसेवेचा वसा आणि वारसा असाच पुढे सुरू ठेवला. सुरुवातीला डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी एमडी मेडिसीन आणि चंडीगडच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमधून डीएम न्यूरोलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले.
वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही महत्वाची भूमिका बजावली. त्यातूनच ते महाराष्ट्र असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजी आणि विदर्भ न्यूरो सोसायटीचे माजी अध्यक्ष राहिले. 2004 मध्ये इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या वार्षिक - कॉन्फरेन्सचे आयोजन सचिव राहिले. सोबतच 2017 मध्ये पहिल्या इंटरनॅशनल ट्रॉपिकल न्यूरोलॉजी कॉन्फरेन्सचे आयोजन सचिव, सार्वजनिक आरोग्य शैक्षणिक उपक्रम, इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीचे मुख्य समन्वयक, नागपूर शहर, स्वच्छ भारत अभियानचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर, बाबा आमटे यांची महारोगी सेवा समिती, वरोराचे विश्वस्त, विदर्भ साहित्य संघ आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य अशा अनेक संस्था, संघटनांसोबत त्यांनी अनेक उल्लेखनीय कार्य केले आहेत.
ही बातमी वाचा: