Anandacha Shidha : 'आनंदाचा शिधा' वादाच्या भोवऱ्यात सापडणार? जिन्नसांमध्ये पामतेल देण्यास ग्राहकांचा आणि शेतकरी संघटनांचा विरोध
Anandacha Shidha : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणारा आनंदाचा शिधा हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.
नागपूर : कोट्यवधी शिधापत्रिका धारकांना दिला जाणारा "आनंदाचा शिधा" (Anandacha Shidha) वादात सापडण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. देशात पामतेल आयात करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे पामतेलाचा प्रचंड साठा आहे. त्यामुळे तोच साठा कमी करण्यासाठी सरकारने आंनदाच्या शिध्यामध्ये पामतेल देण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय. त्यामुळे खाण्यास योग्य नसलेलं पामतेल गरिबांच्या वाट्याला येत असल्याचं कृषी तज्ञ आणि शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी केलाय.
दिवाळीच्या काळामध्ये राज्यातील कोट्यावधी शिधापत्रिका धारकांना महायुतीच्या सराकरकडून हा आंनदाचा शिधा वाटला जातो. पण आता याच आंनदाच्या शिध्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षात जागतिक स्तरावर पामतेलाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे पामतेलाचे जागतिक पातळीवर दर देखील कोसळले आहेत. तर काही व्यापाऱ्यांच्या गोदामातील पामतेलाचा साठा कमी करण्यासाठी आनंदाच्या शिध्यात पामतेलाचा वापर होत असल्याचा आरोप केला जातोय.
नेमकी मागणी काय?
महायुतीच्या सरकारकडून दिवाळी आणि इतर सणांच्या काळात कोट्यावधी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा शंभर रुपयांमध्ये दिला जातो. यामध्ये समाविष्ट असलेल्या तेलावरुन आता वाद निर्माण होऊ शकतो. तर यामध्ये देण्यात येणाऱ्या पामतेलाऐवजी सोयाबिन किंवा इतर भारतीय पिकांपासून तयार करण्यात येणारं तेल देण्याती मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांनी आणि रेशन दुकानदारांनी पामतेल निकृष्ट दर्जाचं असल्याचं म्हटलं आहे. यामुळे खाणाऱ्याच्या घशाला देखील त्रास होऊ शकतो.
ग्राहकांचं म्हणणं काय?
हे पामतेल निकृष्ट दर्जाचं आहे. त्यामुळे शंभर रुपयात येणार आनंदाचा शिधा हा नंतर रुग्णालयाचा खर्च वाढवू शकतो असं ग्राहकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या पामतेलाऐवजी दुसरे तेल देण्याची मागणी ग्राहक करत आहेत. तर ग्राहकांच्या या मागणीचा सरकार विचार करणार की पामतेलच या आनंदाच्या शिध्यामधून घरोघरी पोहचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आनंदाच्या शिध्यामध्ये कशाचा समावेश?
आतापर्यंत रवा, चना डाळ, साखर आणि खाद्यतेल असे चार जिन्नस होते. मात्र आता यामध्ये मैदा आणि पोहे या दोन जिन्नसांची भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता या शिध्यामध्ये अवघ्या शंभर रुपयाता सहा जिन्नस मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय.
लवकरच राज्यभरातील रेशन दुकानांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा पोहोचायला सुरुवात होईल. मात्र आधीच शिध्यामध्ये पामतेल देण्यात येऊ नये अशी मागणी अनेकांकडून करण्यात येतेय. त्यामुळे आता पुनर्विचार करण्याची वेळ सरकारवर आली आहे.