Anandacha Shidha : दिवाळीनिमित्त 100 रुपयात आनंदाचा शिधा, मैदा आणि पोह्याचा देखील समावेश; मंत्रिमंडळाचा निर्णय
Anandacha Shidha : राज्यातील 1.66 कोटी नागरिकांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असून यंदा त्यामध्ये मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई: दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decisions) घेण्यात आला. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चना डाळ, साखर आणि खाद्यतेल असे चार जिन्नस होते. मात्र आता यामध्ये मैदा आणि पोहे या दोन जिन्नसांची भर पडली आहे.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.
Maharashtra Govt. Anandacha Shidha : काय असेल आनंदाच्या शिध्यामध्ये?
राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चना डाळ, मैदा आणि पोहे असे जिन्नस असतील. हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 530 कोटी 19 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.
कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार
कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विदर्भ, मराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी यातून पूर्ण करण्यात येईल.
ही योजना 2018 ते 2020 या वर्षात पूर्ण करावयाची होती. परंतु मुसळधार पाऊस आणि शेतात उभी पिके असल्याने ट्रान्सफॉर्मर्स (रोहित्र) उभारणीत अडथळा निर्माण झाला. कोविडमुळे देखील या योजनेची प्रगती होऊ शकलेली नाही. उपकेंद्रांच्या कामांसाठी लागणारा वेळ 15 ते 18 महिन्यांचा होता. त्यामुळे या योजनेचा मूळ खर्च 5 हजार 48 कोटी 13 लाख इतक्यावरून 4 हजार 734 कोटी 61 लाख इतका सुधारित करण्यात आला. या योजनेचा कालावधी मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आला होता. सध्या 1 लाख 38 हजार 787 वीज जोडण्यांपैकी 23 कृषी पंप वीज जोडण्या आणि 93 उपकेंद्रांपैकी 4 उपकेंद्रांची कामे प्रलंबित आहेत. सध्या पावसाळ्यामुळे या उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्याकरिता योजनेचा कालावधी मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: