एक्स्प्लोर
Advertisement
डेटा लीक प्रकरणी नागपूर महामेट्रोच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकासह एकाला अटक
विशेष म्हणजे विश्वरंजन बेवरा यांची काही आठवड्यापूर्वी कामात कसूर केल्या प्रकरणी विभागीय चौकशी देखील सुरू केली गेली होती.
नागपूर : डेटा लीक केल्याच्या प्रकरणी नागपूर महामेट्रोच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकासह एका ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे. महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थला मेट्रोच्या संबंधातील महत्वाचा डेटा लीक केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. दोघांना आयटी ऍक्ट प्रमाणे अटक होऊन जामीन देखील मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे.
महामेट्रो प्रशासनने या दोघांविरोधात सदर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. महामेट्रोकडून आरोप करण्यात आला आहे की बेवरा यांनी ऑपरेटर समर्थच्या मदतीने महत्वाचा डेटा लीक केला आहे. हा डेटा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या दैनंदिन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग संदर्भातील आहे. ब्रिजेश दीक्षित रोज कनिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामासंदर्भात दिशा निर्देश देतात. मात्र, बेवरा यांच्या सांगण्यावरून समर्थ याने तो ऑडीओ डेटा रेकॉर्ड करत बेवरा यांना सोपविला होता.
आता बेवरा यांनी तो ऑडिओ डेटा बाहेर कोणाला दिला आहे का याची चौकशी पोलीस करत आहे. विशेष म्हणजे विश्वरंजन बेवरा यांची काही आठवड्यापूर्वी कामात कसूर केल्या प्रकरणी विभागीय चौकशी देखील सुरू केली गेली होती. यामुळे बेवरा नाराज होते आणि त्याचमुळे त्यांनी आपल्याच संस्थेमध्ये वरिष्ठांची अशी हेरगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अत्यंत तीव्र गतीने निर्माण कार्य करत नागपूरकरांच्या कौतुकास पात्र ठरलेली महामेट्रो हेरगिरीच्या एका अंतर्गत प्रकरणामुळे हादरली आहे. महामेट्रोच्या सिग्नल एन्ड टेलिकॉम विभागाचे सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर विश्वरंजन बेवरा यांच्यावर महामेट्रोने आरोप लावला आहे की त्यांनी टेलिकॉम असिस्टंट मॅनेजर प्रवीण समर्थ यांच्या मदतीने महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांदरम्यान होणारे संभाषण रेकॉर्ड केले आणि ती माहिती बाहेर पाठविली. या गंभीर प्रकरणाची चुणुक लागल्यानंतर मेट्रो प्रशासनाने सुरुवातीला स्वतःच चौकशी केली होती. त्यात तथ्य आढळ्यानंतर त्याची रीतसर तक्रार नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी ही प्राथमिक तपास केल्यानंतर विश्वरंजन बेवरा आणि प्रवीण समर्थ याला दोघांना आयटी ऍक्ट अन्वये अटक केली आहे.
मुळात या प्रकरणाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली होती. जेव्हा महामेट्रोमधील काही अधिकाऱ्यांना बढती ( प्रोमोशन ) मिळाली होती. मात्र, विश्वरंजन बेवरा यांना बढती मिळाली नव्हती. त्याचे कारण ही त्यांच्या कार्यालयीन अनुशासनहीनतेत होते. नंतर महामेट्रो प्रशासनाला विश्वरंजन बेवरा यांनी राजस्थानच्या जनार्दन राय नागर विद्यापीठातून मिळवलेल्या बी.टेक स्नातक डिग्री बद्दल काही आक्षेपार्ह माहिती मिळाली होती. त्याच आधारावर महामेट्रो प्रशासनाने काही दिवसांपूर्वी बेवरा यांना निलंबित केले होते. जनार्दन राय नागर विद्यापीठाच्या 2011 ते 2005 दरम्यानच्या स्नातकांनी पुन्हा एक पात्र परीक्षा पास करावी त्यानंतरच त्यांना नोकरीत ठेवावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, बेवरा यांनी ती परीक्षा दिलीच नव्हती.
निलंबित झाल्यानंतर ही बेवरा थांबले नाहीत तर त्यांनी टेलिकॉम विभागाचे असिस्टंट मॅनेजर प्रवीण समर्थ यांना सोबत घेतले. दैनंदिन कारभारात वरिष्ठांच्या फोन संभाषणांमधील माहिती प्रवीण समर्थ याने रेकॉर्ड करत विश्वरंजन बेवरा यांना सोपविली. तसेच बेवरा यांनी महामेट्रोला सीएजीकडून विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची माहिती बाहेरच्या लोकांपर्यंत पुरविल्याचेही समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे बेवरा यांनी महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालयीन सर्व्हर मधील पासवर्ड चोरट्या मार्गाने मिळवत स्वतःची सुट्टी मंजूर करून घेतल्याचे ही समोर आले आहे.
या सर्व प्रकाराबद्दल आता पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली आहे. तसेच प्रवीण समर्थ आणि विश्वरंजन बेवरा यांचे मोबाईल ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवणार आहेत. त्याच्या नंतरच बेवरा यांनी महामेट्रोची महत्वाची माहिती किती प्रमाणात आणि कुणाकुणाला पुरविली आहे हे स्पष्ट होऊ शकणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement