Nagpur Crime : महिना उलटूनही सना खान यांचा मृतदेह सापडेना, माहिती देणाऱ्यांना नागपूर पोलिसांकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर
Nagpur Crime : नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान यांच्या मृतदेहाची माहिती देणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
![Nagpur Crime : महिना उलटूनही सना खान यांचा मृतदेह सापडेना, माहिती देणाऱ्यांना नागपूर पोलिसांकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर Nagpur Crime News Nagpur Police announced a reward of one lakh for those who provide information of Sana Khan dead body Nagpur Crime : महिना उलटूनही सना खान यांचा मृतदेह सापडेना, माहिती देणाऱ्यांना नागपूर पोलिसांकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/08/479875ebfced9e2b507b053edfff016b169146876525383_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपुरातील भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या 34 वर्षीय कार्यकर्त्या सना खान (Sana Khan Murder Case) यांचा मृतदेह शोधण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह नागपूर पोलिसांचे (Nagpur Police) दोन पथकं तळ ठोकून आहेत. सना खान यांच्या मृतदेहाची माहिती देणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अमित शाहू तपासात सहकार्य करत नसल्याने अजून नागपूर पोलीस सना खान यांच्या मृतदेहापर्यंत पोहोचू शकले नाहीत. भाजप पदाधिकारी सना खान 2 ऑगस्टपासून जबलपूर इथून बेपत्ता झाल्या होत्या. अमित शाहूने सना खान यांची हत्या करुन मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली होती. मात्र अजूनपर्यंत सना खान यांचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. तर अमित शाहूची नार्कोटेस्ट करण्याच्या परवानगीसाठी नागपूर पोलिसांनी न्यायालयात आधीच अर्ज केला आहे.
महिना उलटला मात्र अद्यापही मृतदेह मिळालेला नाही
दरम्यान सना खान यांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. सना खान यांच्याबाबतीत नेमके काय झाले याचे उत्तरही नागपूर पोलीस देऊ शकलेले नाहीत. या प्रकरणी आजवर सना खान यांचा कथित पती अमित साहू, अमितचे मित्र राजेश सिंह, धर्मेंद्र यादव, रविशंकर यादव आणि कमलेश पटेल अशा पाच आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या होत्या. 1 ऑगस्ट रोजी त्या जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपला गेल्या होत्या, तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील हॉटेल व्यवसायिक अमित साहू उर्फ पप्पूसोबत त्यांची मैत्री होती. काही जण दोघांनी लग्न केल्याचाही दावा करतात. त्याच अमित साहूसोबत 1 ऑगस्टच्या संध्याकाळी सना खान यांचं व्हिडीओ कॉलवर जोरदार भांडण झालं. कधीकाळी अमित साहूला भेट म्हणून दिलेली सोन्याची चेन त्याच्या गळ्यात दिसून न आल्यामुळेच रागवलेल्या सना खान यांनी जबलपूरचा मार्ग धरला होता. सना खान या जबलपूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांनी नागपुरातील आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुखरुप पोहोचल्याचं कळवलं होतं. पण, सनाने त्यांच्या घरच्यांना फोन करुन कळवल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि त्यादेखील पुन्हा परतल्याच नाहीत. त्यानंतर अमित साहूने हत्या केल्याची कबुली दिली होती. परंतु त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)