Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Eknath Shinde & Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील नव्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अजित पवार यांचा समावेश आहे. मात्र, एकनाथ शिंदेंचा समावेश नाही

मुंबई: विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अतिप्रचंड यशामुळे महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष नाममात्र उरल्याची चर्चा सातत्याने होत असते. अशातच भाजप (BJP) आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याचे संकेत देणारी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वगळण्यात आले आहे. मुंबईतील जुलै 2005 सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते. मुख्यमंत्री हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्याने या समितीच्या प्रमुखपदाची सूत्रं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहेत. या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्थान देण्यात आले आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांना या समितीमधूनच वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील नव्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अजित पवार यांच्यासह महसूल, मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्री आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री असूनही त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याची भूमिका ही कायमच महत्त्वाची ठरते. या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणा आणि मदत संबंधित घटनास्थळापर्यंत पोहोचवली जाते. तरीही एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये न घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावर आता सरकारकडून एखादे स्पष्टीकरण किंवा युक्तिवाद मांडला जाईल. मात्र, या सगळ्यामागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याची चर्चा आहे. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली होती. या दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन अंतर्गत संघर्ष असल्याच्या चर्चा होत्या. अगदी अलीकडे पालकमंत्री पदाच्या वाटपावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. हा संघर्ष इतका टोकाला गेला होता की, रायगड आणि नाशिकच्या जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियु्क्तीला स्थगिती देण्यात आली होती.
एकनाथ शिंदेंनी सुरु केलेल्या योजनांना देवेंद्र फडणवीसांचा ब्रेक?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदेंनी तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचे तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. तसेच नव्या सरकारकडून 'आनंदाचा शिधा' आणि 'शिवभोजन थाळी' योजनाही बंद करण्याबाबत विचार सुरु आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

