Nagpur Crime : विहिरीत आढळलेला मृतदेह सना खान यांचा वाटत नाही, कुटुंबियांच्या दाव्यानंतर आता डीएनए चाचणी होणार
Nagpur Crime : नागपुरातील भाजप नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे. कारण मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली परिसरात विहिरीत सापडलेला मृतदेह हा सना खान यांचा नाही असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
नागपूर : नागपुरातील भाजप नेत्या सना खान (Sana Khan) यांच्या हत्या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे. कारण मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली परिसरात विहिरीत सापडलेला मृतदेह हा सना खान यांचा नाही असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. आज नागपूर पोलिसांसोबत (Nagpur Police) हरदा जिल्ह्यात गेलेल्या सना खान यांच्या कुटुंबियांनी तो मृतदेह सना खान यांचा वाटत नसल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सना खान प्रकरणातलं गूढ अजून वाढलं आहे. दरम्यान हरदा जिल्ह्यातील शिराली परिसरात विहिरीत सापडलेला मृतदेह हा सना खान यांच्याशी मिळताजुळता असल्याचं वाटत असल्यामुळे नागपूर पोलिसांनी याप्रकरणी डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्या संदर्भातली प्रक्रिया पार पाडली जाईल.
विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला होता. ही विहीर जबलपूरपासून तीनशे किलोमीटर अंतरावर आहे. हा मृतदेह नागपूर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेहावरील कपडे सना खान यांनी अखेरच्या दिवशी घातलेल्या कपड्यांसारखे दिसत असल्यामुळे तशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र संबंधित मृतदेह सना खान यांचेच आहे हे अजून स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यामुळे नागपूर पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांच्यासोबत सना खान यांचे कुटुंबीय देखील होते. मात्र संबंधित मृतदेह हा सना खान यांचा वाटत नसल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी त्या जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपला गेल्या होत्या, तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील हॉटेल व्यवसायिक अमित साहू उर्फ पप्पूसोबत त्यांची मैत्री होती. काही जण दोघांनी लग्न केल्याचाही दावा करतात. त्याच अमित साहूसोबत 1 ऑगस्टच्या संध्याकाळी सना खान यांचं व्हिडीओ कॉलवर जोरदार भांडण झालं. कधीकाळी अमित साहूला भेट म्हणून दिलेली सोन्याची चेन त्याच्या गळ्यात दिसून न आल्यामुळेच रागवलेल्या सना खान यांनी जबलपूरचा मार्ग धरला होता. सना खान या जबलपूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांनी नागपुरातील आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुखरुप पोहोचल्याचं कळवलं होतं. पण, सनाने त्यांच्या घरच्यांना फोन करुन कळवल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि त्यादेखील पुन्हा परतल्याच नाहीत.
हेही वाचा
Sana Khan : सना खान प्रकरणातील आरोपीला अटक, अमित साहूनं दिली हत्येची कबुली