मोठी बातमी! मराठा कुणबी नोंदीबाबतची जरांगेंची आकडेवारी चुकीची; तायवाडेंचा मोठा दावा
Kunbi Certificate : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिल्याच्या जरांगेंच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागपूर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनानंतर राज्यात फक्त 1 लाख 71 हजार 100 कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले असून, त्यामुळे 57 लाख पेक्षा जास्त कुणबी-मराठा नोंदी सापडल्याचा आणि त्यापैकी 38 लाख पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) निर्गमित झाल्याचा दावा फोल असल्याचा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. जरांगे यांच्या 57 लाख नोंदी सापडल्याच्या दाव्यानंतर ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात फिरून कुणबी प्रमाणपत्रांची अचूक संख्या शोधून काढली आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिल्याच्या जरांगेंच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आपण केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरात मराठा कुणबी नोंदी शोधण्यात आल्या आणि राज्यात तब्बल 57 लाख पेक्षा जास्त कुणबी-मराठा नोंदी सापडल्याचा आणि त्यापैकी 38 लाख पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र निर्गमित झाल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला होता. मात्र, या संपूर्ण दाव्याची सत्यता वेगळीच आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात फिरून 24 ऑक्टोबर 2023 नंतर म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर निर्गमित केलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची अचूक संख्या शोधून काढली आहे. मनोज जरांगे यांनी ज्या 57 लाख 41 हजार 241 कुणबी मराठा नोंदी सापडल्याचा दावा केला त्याची सत्यता वेगळ आहे. कारण फक्त 1 लाख 71 हजार 100 कुणबी प्रमाणपत्र जरांगेंच्या आंदोलन सुरू झाल्यानंतर निर्गमित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मराठ्यांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात फक्त 25 हजार 800 नोंदी...
आणखी धक्कादायक बाब म्हणजे ज्या पुणे (पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्हे) आणि छत्रपती संभाजीनगर ( संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव जिल्हे) विभागात मराठ्यांची सर्वात जास्त लोकसंख्या आहे. त्या दोन्ही विभागात मिळून फक्त 25 हजार 800 कुणबी प्रमाणपत्र जरांगे यांच्या आंदोलनानंतर निर्गमित झालेले आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिल्याच्या जरांगेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया...
दरम्यान यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांची देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने केला आहे. ज्यावर ते म्हणाले की, "आम्ही जरांगेच्या आंदोलनाला काय यश मिळाले या संदर्भात भाष्य करणार नाही. मात्र, त्यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्रच्या मागणी आणि आंदोलनानंतर ही ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाच धक्का बसलेला नाही, हा आमचा दावा खरा ठरल्याचं" मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मनोज जरांगे बीड लोकसभा मतदारसंघातून 'मविआ'चे उमेदवार असणार; भाजप नेत्याचा मोठा दावा