Bacchu Kadu : मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली का? बच्चू कडू उत्तर देताना म्हणाले, '4 नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार'
Maharashtra Assembly Elections 2024 : बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याबाबत आता बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलंय.
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सामना रंगणार असून तर दुसरीकडे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. त्यातच बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याबाबत आता बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले की, महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही जनता कंटाळली आहे. दोन्ही युती-आघाडीत जागावाटपामध्ये तिढा आहे. भाजप आणि काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही. आम्ही मुद्द्यावर लोकांना घेऊन जाऊ. चार तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल. 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल, महाशक्ती हा स्फोट करणार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
4 नोव्हेंबरला मोठा स्फोट पाहायला मिळणार
चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसणार आहेत. युती आणि आघाडी या दोघांना पहिले पाडायचे आहे. जरांगे पाटील यांच्या संबंधात माझे काही बोलणे झाले नाही. उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार, असे म्हणत बच्चू कडूंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला.
राजन तेलींबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया
राजन तेली यांनी गुरुवारी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडून भाजपमध्ये आपले खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, राजन तेली किंवा त्यांच्याबद्दल मला माहिती नाही.
मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो
मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली का? असे विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याची न्यूज तुम्ही चालवली. भेट कशी झाली मला माहिती नाही, मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तर आम्ही आघाडी आणि युती दोघांचाही एन्काऊंटर करणार, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा