Nagpur Rain : नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटला, शेती पिकांना फटका
नागपूरमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. नागपुरातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा (Khaparkheda thermal power station) राखेचा बंधारा फुटल्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Nagpur Rain : राज्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain)सुरु आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. नागपूरमध्येही (Nagpur) सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. नागपुरातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा (Khaparkheda thermal power station) राखेचा बंधारा फुटल्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बंधाऱ्यातून बाहेर निघालेली राख आणि चिखल अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पसरले आहे.
नागपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकतीच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मध्यम पावसातही बंधारा फुटला आहे. मोठा पाऊस झाला तर काठोकाठ भरलेला बंधारा अनेक गावांना उध्वस्त करेल अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खापरखेडा औष्णिक वीज केंद्रामधून निघणारी राख जवळच्या वारेगाव येथील राखेच्या बंधाऱ्यात साठवली जाते. सुमारे 1000 एकर पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला राखेचा हा बंधारा काठोकाठ भरलेला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राखेचा चिखल
काल सकाळी या बंधाराच्या एका भागातून राख मिश्रित चिखलयुक्त पाणी बाहेर निघू लागला. गावकऱ्यांनी बंधार्याला गळती लागल्याची माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिली. मात्र, महानिर्मितीकडून दुरुस्तीचे काम सुरु होता होता दुपार झाली. संध्याकाळ होता होता छोट्या गळतीचे रूपांतरण बंधारा फुटण्यामध्ये झाले. परिणामी मोठ्या प्रमाणावर चिखलयुक्त राख बंधाऱ्याला लागून असलेल्या शेतीमध्ये पसरली आहे. त्यामुळं स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राखेचा चिखल सर्वत्र पसरला आहे. अजूनही नागपुरात मोठा पाऊस झालेला नाही. काल मध्यम स्वरूपाच्या पावसामध्येच जर राखेचा बंधारा फुटणार असेल, तर मुसळधार पावसाच्या वेळेला काय होईल अशी भीती स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लवकरच बंधाऱ्यातून होणारी गळती थांबवली जाईल अशी माहिती
काठोकाठ भरलेला राखेचा बंधारा उन्हाळ्याच्या काळात मोकळीक असताना का रिकामा करण्यात आला नाही असा प्रश्नही गावकऱ्यांनी विचारला आहे. महानिर्मितीने बंधाऱ्यात भेग पडलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. लवकरच बंधाऱ्यातून होणारी गळती थांबवली जाईल अशी माहिती दिली आहे. मात्र, महानिर्मितीचा कोणताही अधिकारी याविषयी कॅमेरासमोर बोलायला तयार नाही.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता
देशभरासह राज्यात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला (Monsoon Update) सुरुवात झाली आहे. या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Rain) अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी नागरिकांना अतिवृष्टीचा सामना करावा लागतोय. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: