Petrol-Diesel वरील करात एक रुपयाही कपात न करता हे लोक महागाईवर बोलतातच कसे? : देवेंद्र फडणवीस
महागाई, बेरोजगारी या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून नवे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत, असं शरद पवार म्हणाले होते. त्यावर महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात महागाई वाढल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूर : "महाराष्ट्रात महागाई वाढवण्याचं काम या सरकारने केलं आहे. पेट्रोल-डिझेलवर 29 रुपये कर लावून एक रुपयाही कर कमी न करता हे लोक महागाईवर बोलतातच कसे हे मला समजत नाही," अशी उत्तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलं आहे. महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था या सगळ्या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून नवे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. त्याचा सामान्य माणसाला काही फरक पडत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
नागपूरमध्ये पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारल असता ते म्हणाले की, "सर्वात आधी पवार साहेबांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे की महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर राज्याचा कर 29 रुपये आहे तर केंद्राचा कर 19 रुपये आहे. ते राज्याचा कर कमी का करत नाहीत? महाराष्ट्रात महागाई वाढवण्याचं काम या सरकारने केलं आहे. पेट्रोल-डिझेलवर 29 रुपये कर लावून एक रुपयाही कर कमी न करता हे लोक महागाईवर बोलतातच कसे काय हे मला समजत नाही."
इंधनदरवाढीबाबत पवार काय म्हणाले होते?
"पेट्रोल-डिझेल इम्पोर्ट केल्यानंतर पहिला टॅक्स हा केंद्र सरकार घेतं. या टॅक्सची लिमिट हे केंद्र करतं. त्यानंतर राज्ये करतात. पहिला टॅक्स जो केंद्राचाच इतका होता की त्यामुळे राज्य सरकारला आपला टॅक्स वाढवावा लागत होता किंवा कमी करण्यासाठी स्कोप नव्हता," असं शरद पवार म्हणाले होते.
लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून नवे प्रश्न उपस्थित
महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था या सगळ्या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचा सामान्य माणसाला काही फरक पडत नाही. सामान्य माणसाला प्रश्न आहे त्याच्या मुलाच्या नोकरीचा, त्याचा प्रपंच चालवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्या किमतीचा प्रश्न आहे. हे प्रश्न आजचे केंद्रातले राज्यकर्ते सोडवू शकत नाहीत. त्यामुळे नाही त्या गोष्टींना लक्ष्य करून कारण नसताना समाजा समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतोय.