Nagpur News : सामान्य कचऱ्यात घातक जैविक कचरा; मनपा पथकाने वसूल केला 6 लाख 85 हजार रुपयांचा दंड
नियम मोडणाऱ्यांमध्ये हॉस्पिटल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनपाच्या धंतोली झोनमध्ये सर्वाधिक 9 प्रकरणे नोंदवून 1 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Nagpur News : रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्यासाठी मनपातर्फे (NMC) स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असताना हॉस्पिटलमधील जैविक कचरा हा सामान्य कचऱ्यात टाकण्यात येत असल्याने गंभीर आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविरोधात नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकांनी (NDS) कंबर कसली असून 1 जुलै ते 30 डिसेंबर दरम्यान पथकाने 1 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जैविक कचऱ्यापासून (Biological waste) गंभीर आजार पसरण्याचा धोका आहे. याचा विचार करता मनपाने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुपर हायजेनिक कंपनीची नियुक्ती केली आहे. ही कंपनी रुग्णालयांतून जैविक कचरा संकलित करते. त्यावर भांडेवाडी येथे प्रक्रिया करुन विल्हेवाट लावली जाते. रुग्णालयांना जैविक कचरा अत्यंत धोकादायक असल्याची जाणीव आहे. असे असूनही हा कचरा सामान्य कचऱ्यात टाकून नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या शहरातील रुग्णालयाविरोधात कारवाईची मोहीम मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी हाती घेतली आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 25 हॉस्पिटलवर मनपाच्या पथकाने कारवाई करुन 6 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नियम मोडणाऱ्यांमध्ये हॉस्पिटल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनपाच्या धंतोली झोनमध्ये सर्वाधिक 9 प्रकरणे नोंदवून 1 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
'या' झोनमध्ये एकही प्रकरण नाही
नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) झोननिहाय आकडेवारीनुसार नेहरुनगर, सतरंजीपुरा व मंगळवारी झोनमध्ये सामान्य कचऱ्यात जैविक कचरा टाकण्याचा एकही प्रकार पुढे आलेला नाही. सामान्य कचऱ्यात जैविक कचरा टाकल्याचे आढळून आल्यास दहा हजारांपासून तर 3 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे अधिकार एनडीएस पथकाला आहेत. मात्र, यासंदर्भात कारवाई करण्यापूर्वी मनपा अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. जैविक कचरा सामान्य कचऱ्यात टाकता येत नाही. जी रुग्णालये जैविक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत नाहीत. अशा रुग्णालयांवर एनडीएस पथक कारवाई करत असते.
मनपाची झोन निहाय जैविक कारवाई
(1 जुलै ते 30 सप्टेंबर 2022)
- लक्ष्मीनगर झोन - 5 प्रकरणे 65 हजार रुपयांचा दंड वसूल
- धरमपेठ झोन - 5 प्रकरणे 3 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल
- हनुमाननगर जोन - 2 प्रकरणे 50 हजार रुपयांचा दंड वसूल
- धंतोली झोन - 9 प्रकरणे 1 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल
- नेहरुनगर झोन -एकही प्रकरणाची नोंद नाही
- सतरंजीपुरा झोन - एकही प्रकरणाची नोंद नाही
- लकडगंज झोन - 1 प्रकरण, दहा हजार रुपयांचा दंड वसूल
- आशीनगर झोन - 3 प्रकरणे, 50 हजार रुपयांचा दंड वसूल
- मंगळवारी झोन - एकही प्रकरणाची नोंद नाही
मनपाचे सर्व दहा झोन मिळून एकूण 25 प्रकरणांची नोंद झाली आणि 6 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Devendra Fadnavis : तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईच्या भूमिकेबद्दल काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?