(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : नागपुरात गणेशपेठ बसस्थानक परिसरात कमिशनच्या वादातून फळविक्रेत्याची हत्या; मारेकऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू
Nagpur Crime : नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानक परिसरात एका फळ विक्रेत्याची कमिशनच्या वादातून हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.
नागपूर : नागपूरच्या (Nagpur) गणेशपेठ बसस्थानक परिसरात एका फळ विक्रेत्याच्या पोटात चाकू भोसकून खून (Murder) करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे बसस्थानक परिसरात तणाव निर्माण झाला आहे. योगेश उमरे असे मृतकाचे नाव आहे. तर चेतन बगमारे, चेतन पाटील आणि त्यांचे इतर साथीदारांनी मिळून योगेशची हत्या केली आहे. मृतक योगेश उमरे हा गणेशपेठ बसस्थानकासमोर फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. यासोबतच तो बस स्थानक परिसरातील चालणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत कमिशनवर कामही करत होता. गणेशपेठ बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स व्यवसायिक व्यवसाय करतात. त्यामुळे बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाश्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी कमिशन स्वरूपात लोकांना नेमण्यात येते. याच वादातून योगेश उमरेची आणि हत्या करणाऱ्यांमध्ये वाद झाला आणि त्यातूनचं त्यांनी ही हत्या केली गेली असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी (Nagpur Police) या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
कमिशनचा वाद विकोपाला
नागपुरातील गणेशपेठ बस स्थानक हे शहरातील प्रमुख बसस्थानक असून दिवसाला येथे हजारोंच्या संख्येने प्रवासी येत असतात. शिवाय यांच परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसायिक देखील व्यवसाय करतात. त्यामुळे प्रवासी मिळवण्यासाठी इतर ट्रॅव्हल्स व्यवसायिकांमध्ये चढाओढ लागलेली असते. प्राथमिक माहिती नुसार, मृतक योगेश उमरे हा गणेशपेठ बसस्थानक समोर फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. योगेश जुना आरोपी असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे योगेशचा बसस्थानक परिसरात दबदबा आहे. फळ विक्रीचा व्यवसाय सोबतच योगेश कमिशनच्या मोबदल्यात येथील खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी बसवायचा. त्यामुळे त्याच्याशी निगडीत ट्रॅव्हल्स चालकांना सहज प्रवासी मिळतात. तर त्याच्या प्रतिस्पर्धी ट्रॅव्हल्स संचालक तसेच गुन्हेगारांसोबत त्याचा वाद सुरू होता. दरम्यान, गुरुवारी त्याचा पार्किंगबाबत बसस्थानकावर वाद झाला. या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी हफ्ता वसुलीचा गुन्हाही दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास योगेश बसस्थानकावर प्रवासी शोधत होता. त्यावेळी चेतन नावाचा आरोपी आपल्या तीन ते चार साथीदारांसह तेथे आला. त्यांनी योगेशवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. अल्पावधीतच योगेश रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला.
टोळीयुद्ध भडकण्याची शंका
घटनेच्या वेळी परिसरात चांगलीच वर्दळ होती. घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी योगेशला रुग्णालयात पोहोचविले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. योगेश परिसरात चर्चेत असलेल्या मेश्रामचा साथीदार होता. त्यामुळे या परिसरात टोळीयुद्ध भडकण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा