Nitin Gadkari : ज्येष्ठ आणि दिव्यांगाना तीर्थ क्षेत्र दर्शनासाठी नि:शुल्क ई-बस सेवा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेता यावे याकरिता नागपूर-शेगाव अशी बस सेवा सुरू आहे. आता आदासा, माहूर, धापेवाडा या तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी ई-बस सुरु करण्यात येणार आहे.
नागपूर : पूर्व नागपुरात (East Nagpur) महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कला मंजुरी मिळाली असून, येत्या तीन महिन्यात पार्कच्या (First Disabled Park in Maharashtra) कामाला सुरुवात होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना नागपूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी लवकरच निःशुल्क ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ई-बसेस नागपुरात आणणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन व राज्य महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यामध्ये एक डबलडेकर ई-बसचा (E-Bus) समावेश असणार आहे.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहाय्यता योजना (अडीप - असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरात विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरणाचे शिबिर घेण्यात येत असून, या अंतर्गत गुरूवारी 1 सप्टेंबर 2022 रोजी पूर्व नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता सरदार वल्लभभाई पटेल (कच्छीविसा) मैदान, लकडगंज येथे शिबीर घेण्यात आले. यावेळी नितीन गडकरी बोलत होते.
अदासा, माहूर, धापेवाडासाठी निशुल्क सेवा लवकरच
गडकरी पुढे म्हणाले की, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेता यावे याकरिता नागपूर-शेगाव अशी बस सेवा सुरू आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना नागपूर ते आदासा, नागपूर ते माहूर, नागपूर ते धापेवाडा अशा तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी डबलडेकर ई-बस सुरु करण्यात येणार आहे. तसेच लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्यात येणार असल्याचेही ना. गडकरी यांनी सांगितले. याशिवाय पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनीमध्ये सुरू होणाऱ्या विरंगुळा केंद्रांचेही लवकरच उद्घाटन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पूर्व नागपुरातील 4549 लाभार्थ्यांना साहित्य वाटप
समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना सर्व सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नागपुरातील सर्व विधानसभा क्षेत्रात विविध मेळावे घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पूर्व नागपुरातील 4549 (अडीप - 590, वयोश्री- 3959) लाभार्थ्यांना एकूण 34130 (अडीप- 1202, वयोश्री- 32928) साहित्य, उपकरणे वितरित करण्यात आले. या साहित्याची एकूण किंमत 4.82 कोटी रुपये एवढी असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. शहरातील हजारो दिव्यांग आणि ज्येष्ठांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे कौतुक केले. नितीन गडकरी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरुपात दहा दिव्यांगाना व ज्येष्ठ नागरिकांना केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उपकरणे प्रदान करण्यात आली.
रेशिमबागच्या कार्यक्रमाच्या आठवणी
कार्यक्रमात केंद्र सरकारच्या दिव्यांग सहाय्यता योजना (अडीप - Disability Aid Scheme) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना (National vyoshri Yojana) संदर्भातील माहिती चित्रफीत व दक्षिण नागपूरातील रेशिमबाग (Reshimbag) येथे झालेल्या लाभार्थी कार्यक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर म्हणाले की, सामाजिक सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत साहित्य वाटप करण्यात येत आहे. नागरिकांना याचा निश्चित लाभ होईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (एलिम्को), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि सीआरसी नागपूर यांनी सहकार्य केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या