Nagpur Crime News : भाजप नेत्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला प्रकरणाचा CCTV व्हिडीओ आला समोर: अल्पवयीनसह सहा आरोपींना अटक
Nagpur Crime : किरकोळ वादातून भाजपचे नेते मुन्ना यादव यांच्या मुलासह तिघांवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत एका अल्पवयीनसह 6 आरोपींना अटक केली.
नागपूर : किरकोळ वादातून नागपुरातील (Nagpur) मेडिकल चौकातील एका पबमध्ये 25 डिसेंबरच्या पहाटे झालेल्या मारहाण प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV Video) समोर आला आहे. या प्राणघातक हल्यात कुख्यात गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने भारतीय जनता पक्षाचे नेते मुन्ना यादव (Munna Yadav) यांच्या मुलासह तिघांवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणातील तपसाचे धागेदोरे पुढे सरकल्या नंतर या हल्ला प्रकरणात नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने एक अल्पवयीनसह सहा आरोपींना अटक केली. ज्यामध्ये कुख्यात गुन्हेगार प्रदीप उईके आणि त्याचा टोळीने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे.
किरकोळ वाद विकोपाला!
प्रदीप पूरनदास उईके (32), कुणाल नरेश उईके (24), विवेक लेकराज बनोटे (27), सुमित शाहू (23) अशी अटकेतील आरोपींची नावे असून हे सर्व कुंभारटोली परिसरातील रहिवासी आहेत, तर आरोपी दिलीप उर्फ दीपू सिरसाम (30) हा कोराडीतील नूरनगर येथील रहिवासी आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. हल्ल्यात अर्जुन ओमप्रकाश यादव, आशिष हजारे आणि आनंद शहा हे जखमी झाले होते. आनंद शहाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, अर्जुन आणि आशिषवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
असा घडला प्रकार
भाजप नेता मुन्ना यादवचा मुलगा अर्जुन हा आपल्या दोन मित्रांसोबत 25 डिसेंबरच्या रात्री मेडिकल चौकातील एजंट जॅक पबमध्ये आला होता. यावेळी आरोपी प्रदीप उईके हा देखील त्याचा मित्रमैत्रिणीसह तेथे पार्टीसाठी आला होता. त्यानंतर मध्यरात्री सर्व पार्टी आटपून बाहेर आले. दरम्यान, प्रदीपच्या मित्राचा अर्जुनाचा मित्र असलेल्या आशिषला पाय लागला. यावरून दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला आणि प्रकरण विकोपाला जाण्यापूर्वी मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून तो वाद तिथे मिटवला. त्यानंतर अर्जुन आपला मित्र आशिष आणि आनंदला सोबत घेऊन कारने घराकडे निघाले. मात्र प्रदीपणे त्या वादाला अद्याप पूर्ण विराम दिला नव्हता. त्यामुळे त्याने अर्जुनच्या कारचा पाठलाग केला. या पाठलाग दरम्यान प्रदीपणे आपल्या काही मित्रांनाही फोन करीत बोलावून घेतले. अर्जुन अजनीतील कांबळे चौकात पोहचला असता या पाठलागवर असणाऱ्यानी अर्जुनची कार अडवत अर्जुन व त्याच्या मित्रांना वाहनातून खेचत बाहेर काढले. त्यानंतर दगड आणि शस्त्रांनी या तिघांना जबर मारहाण केली. हल्ला करून गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना अटक
घटनेनंतर इमामवाडा पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. ज्यामध्ये गुन्हे शाखा युनिट 4 ने घटनेचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात आरोपींची शोध घेतला असता आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, मोटारसायकल आणि 4 मोबाईलसह 7,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हे ही वाचा :