(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा ‘पॅटर्न’ आणणार; फडणवीसांचे सूतोवाच
Devendra Fadnavis : उद्योग व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्वाचा वीजपुरवठा असून अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय उभारताना यामध्ये सवलत मिळण्याची मागणी योग्य आहे.
नागपूर : उद्योग व्यवसाय तुलनेने कमी असणाऱ्या विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada) या भागात उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा (Electricity Supply) करणारा पॅटर्न महाराष्ट्रात लवकरच राबविला जाईल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सव अर्थात ॲडव्हाँटेज विदर्भ या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन तसेच उद्योजकांचे संमेलन यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून फडणवीस बोलत होते.
यावेळी फडणवीसांनी गुंतवणुकदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्योग व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्वाचा वीजपुरवठा असून अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय उभारताना यामध्ये सवलत मिळण्याची मागणी योग्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संदर्भातील एक पॅटर्न आम्ही तयार करीत आहोत. याचा फायदा उद्योग समूहांना होईल. मात्र, मराठवाडा-विदर्भ यासारख्या मागास भागात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांनाच या पॅटर्नचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणताही उद्योग उभारण्यासाठी वीज, पाणी, मध्यवर्ती ठिकाण व अन्य पायाभूत सुविधांची गरज असते. केंद्रीय रस्ते, महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विदर्भातील रस्त्यांचे जाळे मजबूत व दीर्घकाळासाठी उत्तम झाले आहे. समृद्धी महामार्गामुळे एक वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी पुरवठा साखळी विदर्भात निर्माण झाली आहे.मोठे लॉजिस्टिक क्लस्टर आम्ही नागपूरमध्ये निर्माण करणार आहोत. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नागपूरला जगामध्ये पुढे आणायचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
गडकरी फडणवीस यांचे डबल इंजिन विदर्भाचा सुवर्णकाळ : नारायण राणे
याच कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भाचा पूर्ण अभ्यास आहे. कुठे काय निर्माण होऊ शकते, कोणत्या जिल्ह्याला कोणता उद्योग उपयोगी पडू शकते यशस्वी होऊ शकते, याची माहिती असणारे हे नेतृत्व आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा हा सुवर्णकाळ असल्याचे नारायण राणे म्हणाले.
नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार : नितीन गडकरी
विदर्भाच्या विकासासाठी काय करता येईल,याच्या विचार मंथनासाठी ॲडव्हांटेज विदर्भ व खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोलीपासून वाशिम पर्यंत आणि बुलडाण्यापासून गडचिरोलीपर्यंत आम्ही चांगले रस्ते तयार केले. पाणी, वीज, पायाभूत सुविधा, विस्तीर्ण रस्ते, तंत्रज्ञान यासह केंद्रातून कोणतीही मदत लागल्यास मी तत्पर आहे. राज्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार आहेत. सोबतीला राज्याचे माजी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म लघू मध्यम मंत्री नारायण राणे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे आता विदर्भात विकास झाला पाहिजे. गुंतवणूकदारांनी आरोग्य, अभियांत्रिकी, औषधी,पर्यटन, हॉटेल व्यवसाय व अन्य लॉजिस्टिक सारख्या मोठ्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे. तर, नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: