Nagpur Crime : चिमुकलीचे सततचे आजारपण, बडबडने अन् वेगळे हावभाव, भूतबाधेच्या संशयातून शिक्षित पालकांकडून स्वतःच्या मुलीची हत्या
भूतबाधेच्या संशयाच्या विळख्यात अडकलेल्या पालकांना काहीच वाटले नाही. लाथा-बुक्क्यांनी मारून थकल्यावर त्यांनी बेल्ट काढून त्या चिमुकलीला जबर मारहाण केली. वेदना असहाय्य झाल्याने चिमुकलीने प्राण सोडले.
![Nagpur Crime : चिमुकलीचे सततचे आजारपण, बडबडने अन् वेगळे हावभाव, भूतबाधेच्या संशयातून शिक्षित पालकांकडून स्वतःच्या मुलीची हत्या constant illness babbling and different gestures killing of own daughter by educated parents in nagpur Nagpur Crime : चिमुकलीचे सततचे आजारपण, बडबडने अन् वेगळे हावभाव, भूतबाधेच्या संशयातून शिक्षित पालकांकडून स्वतःच्या मुलीची हत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/963675e60ec0fd21813a6f974259306e1658649547_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूरः गेल्या अनेक दिवसांपासून सहा वर्षांची चिमुकली आजारी होती. डॉक्टरांचे औषधही सुरु होते. तरी काही आराम मिळत नव्हते. त्यामुळे मुलीचे सततचे आजारपण, बडबडणे आणि वेगळे हावभाव, म्हणजे तिचा काही तरी झपाटल्याचा संशय एका भोंदूबाबाने मुलीच्या पालकांच्या मनात पेरला. पालकही वैद्यकीय उपचाराला गांभीर्याने न घेता भोंदू बाबाच्या नादी लागले. त्याने सांगितल्याप्रमाणे मुलीला जबर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही चिमुकली जिवाच्या आकांताने रडत होती. मात्र भूतबाधेच्या संशयाच्या विळख्यात अडकलेल्या पालकांना काहीच वाटले नाही. लाथा-बुक्क्यांनी मारून थकल्यावर त्यांनी बेल्ट काढून त्या चिमुकलीला जबर मारहाण केली. वेदना असहाय्य झाल्याने चिमुकलीने प्राण सोडले.
ही संतापजनक घटना नागपुरात रविवारी उघडकीस आली. सुभाष नगर भागात राहणाऱ्या चिमणे कुटुंबियांकडे हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, घरातील मंडळी शिक्षित असून देखील या भोंदूबाबावर विश्वास करुन आपल्या मुलीला गमवून बसले आहेत. पोटच्या मुलीचे आजारपण, तिचे बडबडने आणि वेगळे हावभाव करणे. मुलीला आरोग्यंसदर्भात काही नसून काही भूतबाधा झाल्याची शंका तिच्या पालकांना आली. मात्र या शंकेमुळे आई वडिल आणि मावशीने मिळून एका सहावर्षीय चिमुकलीचा जीव घेतला. या धक्कादाय प्रकरणानंतर पोलिसांनी आई-वडील आणि मावशीला तर अटक केलीच आहे. मात्र, ज्या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून आई वडिलांनीच चिमुकलीला बेदम मारहाण करत जीवे मारले, त्या भोंदू बाबाला ही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
शुक्रवारच्या रात्री सिद्धार्थ आणि रंजना चिमणे या दाम्पत्याने आपल्या एका महिला नातेवाईकासोबत मिळून स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. कारण त्यांना सहा वर्षीय चिमुकलीला भूत बाधा झाल्याचा संशय होता. ही भूत बाधा मारहाण करून दूर होईल असे एका भोंदू बाबाने त्यांना सांगितले होते. त्यामुळे भोंदू बाबाने सांगितल्या प्रमाणे लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जेव्हा ते दमले, तेव्हा बेल्ट ने ही चिमुकलीला मारहाण करण्यात आली. लहानगी एवढा जबर मार सहन करू शकली नाही आणि निपचित पडली.
अन् मृतदेह सोडून पळाले
घाबरलेल्या चिमणे दाम्पत्यांनी तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील आकस्मिक रुग्ण विभागाच्या समोर पोहोचून मुलगी दगावल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि चिमणे दाम्पत्त्यानी मुलीचे मृतदेह तिथेच टाकून पळ काढले. मात्र, ते पळून जाताना रुग्णालयातील सुरक्षाकर्मीना संशय वाटले आणि त्यांनी वाहनाचा फोटो काढला. मुलीचे मृतदेह पाहून पोलिसांना संशय वाटले आणि पळून गेलेल्या आई वडिलांचा शोध सुरु झाला.
आता मुकदर्शक नातेवाईकांचा शोध!
गेले काही दिवस चिमने दाम्पत्याच्या लहान मुलीची तब्येत बरी नव्हती. डॉक्टरांचा उपचार ही सुरु होता. मात्र, तरी ही चिमणे दाम्पत्त्याना मुलीला भूत बाधा झाल्याचा संशय होता. पालकांच्या मनात लेकीबद्दल असा संशय भरवणारा कोण याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आणि शंकर बाबा नावाच्या एका भोंदू बाबाचा नाव समोर आला. चिमणे दाम्पत्त्य मुलीच्या तब्येती बद्दल तसेच तिच्या बडबडण्याबद्दल या भोंदू बाबाच्या संपर्कात होते. त्याच्याच सांगण्यावरून गेले काही दिवस लहानगीला भूतबाधा झाली आहे या नावाखाली मारहाण केली जात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आई वडील, महिला नातेवाईक आणि भोंदू बाबा अशा चार आरोपीना अटक केली असून कुटुंबातील इतर ही लोकं या प्रकरणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दोषी आहेत का याचा तपास पोलीस करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)