New Vice President India : महाराष्ट्राचे राज्यपाल बनले देशाचे नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं, इंडिया आघाडीचे खासदार फुटले
New Vice President India सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल (Maharashtra New Governor CP Radhakrishnan) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

नवी दिल्ली : भाजप एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन (Radhakrishnan) हे देशाचे नवे उपराष्ट्रपती (Vice president) बनले आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन विजयी झाल्याने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आता देशाचे उपराष्ट्रपती झाले आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, उपराष्ट्रपदीपदासाठी भाजपकडून कोणाला संधी मिळणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजपने नेहमीप्रमाणे नावाचे धक्कातंत्र दिले. सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे महाविकास आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. अखेर, आज झालेल्या मतदानानंतर राधाकृष्णन यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.
एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे खासदार फुटल्याचे निकालानंतर समोर आलं आहे. कारण, भाजप उमेदवार राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतदान मिळालं आहे. सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले असून त्यांना 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. त्यामुळे, 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीच्या मतांनी त्यांचा विजय झाला असून बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं पडली आहेत. या निवडणुकीत 15 मतं बाद झाली. दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी निवड मंडळात 782 सदस्य असतात, त्यापैकी 543 लोकसभेचे आणि 239 राज्यसभेचे असतात.
सीपी राधाकृष्णन यांची झारखंडनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माजी राज्यपाल रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते झारखंडचे (Jharkhand) राज्यपाल होते. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) तयारी सुरु असताना राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर, महाराष्ट्रातून ते आता थेट दिल्लीच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत.
मोदींकडून अभिनंदन, भाजपचा काँग्रेसला टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या विजयानंतर सीपी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांनी आपलं आयुष्य सर्वसामान्य, गरीबांसाठी व समाजासाठी खर्ची केल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. तर, भाजप खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसला टोला लगावला. राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावे, असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरचा दाखला दिला. खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे, ही निवडणूक ईव्हीएमवर नाही बॅलेट पेपरवर झालेली आहे, त्यामुळे राहुल गांधींनी आत्मपरिक्षण करावं, असेही गोपछडे यांनी म्हटलं.
Congratulations to Thiru CP Radhakrishnan Ji on winning the 2025 Vice Presidential election. His life has always been devoted to serving society and empowering the poor and marginalised. I am confident that he will be an outstanding VP, who will strengthen our Constitutional…
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2025
सीपी राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास
सीपी राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. यावेळी त्यांचे वय 17.5 वर्ष होते. सीपी राधाकृष्णन हे देखील दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकिटावर जिंकल्या. पण 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.
सीपी राधाकृष्णन यांना खेळाचीही आवड
सीपी राधाकृष्णन यांना खेळाची खूप आवड आहे. त्यांना टेबल टेनिस, क्रिकेट आणि व्हॉलिबॉल या खेळांची आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात त्यांचं टेबल टेनिस आणि धावण्यात विशेष प्राविण्य होतं. 1978 मध्ये त्यांनी मदुराई विद्यापीठामधून बीबीएचं शिक्षण घेतलं होतं. तसेच राज्यशास्त्रात त्यांनी पीएचडी देखील केली आहे.
अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या
देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणूम सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्या राज्यात कोण नवीन राज्यपाल?
हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
सी एच विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
आसामचे राज्यपाल श्री गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती. चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.
दिल्ली ते काठमांडू विमानसेवा बंद, सरकारकडून भारतीयांसाठी अॅडव्हाईजरी जारी, हेल्पलाईनही नंबरही दिला
























