दिल्ली ते काठमांडू विमानसेवा बंद, सरकारकडून भारतीयांसाठी अॅडव्हाईजरी जारी, हेल्पलाईनही नंबरही दिला
नेपाळ मधील सध्याची परिस्थिती विचारात घेता, भारतीय नागरिकांनी परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रवास करणे टाळावे.

काठमांडू : भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये (Nepal) मोठी राजकीय उलाथापालथ झाली असून पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना चक्का लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेपाळमधील या घटनेनं जगभरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून भारतानेही (India) या घटनांची दखल घेत नेपाळमधील भारतीयांना व नेपाळमध्ये जाण्याचं नियोजन करणाऱ्यांसाठी अॅडव्हाईजरी जारी केली आहे. त्यानुसार, नेपाळमधील परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत कुणीही नेपाळचा प्रवास करू नये, असे भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. तर, दिल्ली ते काठमांडू विमानसेवाही बंद करण्यात आली आहे.
नेपाळ मधील सध्याची परिस्थिती विचारात घेता, भारतीय नागरिकांनी परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रवास करणे टाळावे. सध्या नेपाळमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षित आश्रय घ्यावा. रस्त्यावर किंवा बाहेर पडणे टाळावे. सर्वोतपरी काळजी घ्यावी, असे आवाहन भारताकडून करण्यात आले आहे. नेपाळ प्रशासन तसेच काठमांडू मधील भारतीय दूतावासाच्या मार्फत प्राप्त होणाऱ्या स्थानिक सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोणत्याही मदतीसाठी, कृपया खालील हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून काठमांडू स्थित भारतीय दूतावास सोबत संपर्क साधावा, असेही आवाहन भारतीय नागरिकांना भारतीय दुतावासाकडून करण्यात आले आहे. तसेच, व्हॉट्सअप कॉलसाठी दोन संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
1. +977 - 980 860 2881 (व्हॉट्सअप कॉल साठी सुद्धा)
2. +977 – 981 032 6134 ( व्हॉट्सअप कॉल साठी सुद्धा )
नेपाळची लोकसंख्या 2.97 कोटी
नेपाळच्या 2021 च्या जनगणनेनुसार देशाची एकूण लोकसंख्या सुमारे 2.97 कोटी आहे, ज्यामध्ये 81.19 टक्के लोक हिंदू आहेत. म्हणजेच जवळपास 2 कोटी 36 लाख लोक हिंदू धर्माचे पालन करतात. नेपाळ कधीकाळी जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होतं, पण आता ते धर्मनिरपेक्ष देश झालं आहे. मात्र 2011 च्या तुलनेत हिंदू लोकसंख्येत किंचित घट झाली आहे.
नेपाळमधील सत्तांतर, हिंसाचाराचं नेमकं प्रकरण काय?
नेपाळमध्ये काही सोशल मीडिया साईटवर बंदी घालण्यात आली होती. सोशल मीडियावरील बंदीच्या विरोधानिमित्ताने तरुणाई रस्त्यांवर उतरली आणि त्यांनी थेट संसद पेटवली, न्यायालयाला आग लावली. गेल्या अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात या युवकांनी हिंसक भूमिका घेतली. नेपाळमधील आंदोलनात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला. केपी शर्मा ओली यांनीही आपला राजीनामा दिला असून लवकरच नव्या पंतप्रधानांची निवड होईल. नेपाळच्या युवकांनी आंदोलन करत थेट मंत्र्यांच्या घरांवर हल्लाबोल केला. त्यामुळे मंत्र्यांनी देश सोडून जाण्याचा मार्ग पत्करला. आंदोलकांनी बालेन शाह यांना पंतप्रधान करा अशी भूमिका घेतल्यानंतर लष्कर प्रमुख आणि बालेन शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. बालेन शाह आता नेपाळच्या अंतरिम सरकारचे प्रमुख असतील यावर शिक्कामोर्बत झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून नेपाळच्या राजकारणामध्ये चीनने मोठा हस्तक्षेप केला आहे. परिणामी त्या देशात आता आंदोलन सुरू झालं आहे. नेपाळ हा भारताचा जवळचा मित्र आहे. नेपाळच्या आंदोलनाचा परिणाम हा भारतावरही होऊ शकतो. त्याचमुळे भारतानेही नेपाळच्या सर्व परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली आहे.

























