Nagpur : मोकाट कुत्र्यांसंदर्भात तक्रारींसाठी नागपूर महापालिकेचा नवा फंडा, आता करा हे काम
हायकोर्टाने फटकारल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली असून आतापर्यंत फक्त 'चमकोगिरी'साठी वापरण्यात येणाऱ्या सोशल मीडियावर आता मनपा प्रशासन भटक्या कुत्र्यांसदर्भातील तक्रारी स्वीकारणार आहे.
Nagpur News : नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) ढिसाळ नियोजनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरातील मोकाट कुत्र्यांसंदर्भात कुठलीही उपाय योजना करण्यात आली नाही. मात्र हाटकोर्टाने फटकारल्यावर मनपा प्रशासनाला जाग आली असून आता लिखित तक्रारींसह सोशल मीडियावरील तक्रारींचीही दखल मनपाच्यावतीने घेण्यात येणार आहे. नागरिकांना मोकाट भटक्या कुत्र्यांसंदर्भात तक्रारी असल्यास त्यांना मनपाच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅपवरही तक्रार नोंदवता येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळून आल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर मनपाद्वारे 200 रुपये दंड आकारण्यात येत आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरता नागपूरकरांनी नागपूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्तांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभाग (पशुवैद्यकीय सेवा) द्वारे झोन निहाय तक्रारी श्वान पथकांव्दारे करण्यात येत असुन त्याकरीता सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये लेखी तक्रारी व महानगरपालिकेच्या 'नागपूर सिटी लाईव्ह अॅप' व्दारे तक्रारी स्विकारण्यात येतात. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेव्दारे लेखी व ऑनलाईन माध्यमांव्यतिरिक्त नागरीकांच्या सोयीकरीता व्हॉट्स अॅप, ट्वीटर, इन्स्टाग्राम व फेसबुक या माध्यमांव्दारे सुध्दा तक्रारी महानगरपालिकेच्या डॉग कंन्ट्रोल सेल द्वारे स्विकारण्यात येणार आहेत.
नियम काय आहे...
शहर व लगतच्या परिसरातील कुणीही व्यक्ती/रहिवाशी मोकाट/भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, इत्यादी ठिकाणी अन्न खाऊ घालणार नाही. मोकाट/भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तींनी स्वत:च्या घराच्या व्यतिरीक्त इतर कुठल्याही ठिकाणी अन्न खाऊ घालू नये, जर कोणी व्यक्ती मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालण्यास इच्छुक असेल त्यांनी त्या मोकाट/भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्यावे, त्यांना घरी आणावे, त्यांची महानगरपालिकेमध्ये रीतसर नोंद करुन घ्यावी किंवा त्यांना डॉग शेल्टर मध्ये ठेवावे यासह त्यांचे लसीकरण व आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घ्यावी असे आदेश पारित केले आहे. मनपाद्वारे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन केल्या जात आहे. शहरातील त्रासदायक मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी मनपाच्या समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) पाठवावी व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता मनपाचे सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी नागरिकांना केले आहे.
मनपाच्या सोशल मीडियावर स्वीकारणार तक्रारी
- व्हॉट्स अॅप क्रमांक :- 9175414524
- इन्स्टाग्राम :- @nmcngp
- ट्विटर :- @ngpnmc
- फेसबुक :- @nmcngp
हेही वाचा