Nagpur Bird Flu : केवळ प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातच बर्ड फ्लूचे संक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र वगळता बर्ड फ्लूचे संक्रमण अद्याप इतर कुठेही आढळून न आल्याने नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Nagpur News नागपूर : नागपूरातील राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्याना बर्ड फ्लूचे (Bird Flu) संक्रमण झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पशू संवर्धन विभागासह सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून या संबंधित योग्यती काळजी पशू संवर्धन विभागाच्या (Nagpur News) वतीने घेण्यात आली. परिणामी, जिल्ह्यात इतर कुठेही या आजाराची लागण झाल्याचे अद्याप समोर न आल्याने नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
सोबतच, या रोगाचा प्रादूर्भाव आणि प्रसार टाळण्यासाठी तसेच त्यावरील उपाययोजनांसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचा (एनसीडीसी) चमूने नागपूरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात भेट दिली. त्यावेळी त्यांनी या पोल्ट्री फार्मची पाहणी करून येथील इन्फेक्शन बाहेर जाणार नाही, यासंबंधित योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
केवळ प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातच बर्ड फ्लूचे संक्रमण
गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. त्यानंतर पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे, हे तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर चार मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र मधील पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे मान्य केले. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानंतर आता पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर आले असून आरोग्य उपसंचालक कार्यालयात सर्व संबधित यंत्रणांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कविता मोरे, साहाय्यक संचालक आरोग्य डॉ. प्रदीप आवटे, डॉ. प्रमोद गवई आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात इतर कुठेही या आजाराची लागण झाल्याचे अद्याप कोठेही निदर्शनात न आल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर
शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्भव झाल्यानंतर पाळावयाच्या सर्व नियमांचे पालन करत कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, खबरदारीचे उपाय म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व ठिकाणच्या चमू सज्ज केल्या आहेत. प्रादेशिक अंडी उबवणीं केंद्रापासून चार ते पाच किलोमीटरच्या परिसरातील पक्षी आणि कोंबड्यांना 'बर्ड फ्लू'ची लागण तर झाली नाही ना, याची तपासणी करण्याचा सूचनाही दिल्या आहेत.
तसेच या केंद्राच्या दहा किलोमीटरच्या परिसरातील सर्वच पोल्ट्री फार्म्सवर निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कालावधी मध्ये प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
