नागपूरमध्ये एटीएम मशीन गॅस कटरने कापून तब्बल 19 लाखांची रोकड लंपास, महिनाभरातली नववी घटना
रामटेक तालुक्यातील मनसरमध्ये एटीएम मशीन गॅस कटरने कापून चोरट्यानी तब्बल 19 लाख 90 हजार 500 रुपये चोरून नेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 22 दिवसात नागपूर जिल्ह्यात एटीएम फोडून लाखोंची रक्कम लंपास केल्याची ही नववी घटना आहे.
नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. कारण एका बाजूला भोळे पेट्रोल पंप चौकावर शेकडो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या किशोर बिनेकर हत्या प्रकरण आणि त्यानंतर जरीपटकामध्ये अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तपास पूर्ण झाला नसताना आता चोरट्यांनी एटीएममधून लाखो रुपयांची रक्कम लंपास केली आहे. रामटेक तालुक्यातील मनसरमध्ये एटीएम मशीन गॅस कटरने कापून चोरट्यानी तब्बल 19 लाख 90 हजार 500 रुपये चोरून नेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 22 दिवसात नागपूर जिल्ह्यात एटीएम फोडून लाखोंची रक्कम लंपास केल्याची ही नववी घटना आहे.
नागपूर जिल्ह्यातील मनसरमध्ये काल अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाच्या एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने कापून तब्बल 19 लाख 90 हजार 500 रुपये चोरून नेले. मिळालेल्या माहितीनुसार मनसर - रामटेक रस्त्यावर निर्जन ठिकाणी बँक ऑफ इंडियाचे हे एटीएम सेन्टर असून तिथे 2 मशीन आहेत. या एटीएम सेन्टरवर गार्ड नसतो. मात्र तिथे सीसीटीव्ही लागलेले होते. अज्ञात चोरट्यांनी काल एटीएम सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर आधी काळ्या रंगाचे स्प्रे मारला. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमरे एटीएम सेंटरमधील हालचाल टिपू शकले नाहीत. त्यानंतर चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीनचा व्हॉल्ट कापून काढला आणि त्यामधून लाखो रुपये लंपास केले. विशेष म्हणजे या एटीएम सेंटरमध्ये शेजारीच दोन मशीन असताना चोरट्याने फक्त एकाच मशीनला लक्ष्य करत त्यामधून लाखोंची रक्कम लंपास केली.
ज्या एटीएम सेंटरमधून ही चोरी झाली त्यापासून 300 मीटर वरच पोलीस चौकी आहे. त्यामुळे तिथे दिवसातून अनेक वेळा पोलिसांची ये-जा असते. असे असतानाही चोरट्यांनी त्याच एटीएम सेंटरला लक्ष्य केल्याने चोरट्यांना पोलिसांची भीती नव्हती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात किंवा चोरी गेलेली रक्कम हस्तगत करण्यात यश आलेले नाही.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात एटीएम सेंटरमधून चोरीची ही एकमेव घटना नसून 12 सप्टेंबरपासून आजवर अवघ्या 22 दिवसात चोरट्यांनी एका नंतर एक 9 घटना घडवून विविध बँकांना लाखोंचा चुना लावला आहे.
-12 सप्टेंबर - नागपूर शहरातील आशीर्वादनगर येथून एसबीआयच्या एटीएम सेंटर मधून 1 लाख 66 हजार चोरीला गेले. - 13 सप्टेंबर - म्हाळगीनगर चौकातील एटीएममधून काही रक्कम चोरीला गेली. - 14 सप्टेंबर - कळमना नाका नंबर 4 जवळच्या एसबीआयच्या एटीएम सेंटरमधून 82 हजारांची रक्कम चोरीला. - 15 सप्टेंबर - हिंगणा टी पॉईंट जवळच्या एका एटीएममधून 2 लाख 13 हजारांची रक्कम चोरीला गेली. - 15 सप्टेंबर - नागपूर जवळच्या वाडी परिसरात एका एटीएम मधून 1 लाख 80 हजारांची रक्कम चोरट्यांनी पळविली. - 16 सप्टेंबर - चिचभुवन पुलाजवळच्या एसबीआयच्या एटीएम मधून 80 हजारांची रक्कम चोरट्यांनी उडवली. - 17 सप्टेंबर - वर्धमान नगरमधील एटीएम मधून 1 लाख 25 हजारांची रोकड चोरीला गेली. - 23 सप्टेंबर - वाडी भागात कॅनरा बँकेतील एटीएम मधून 2 लाख 39 हजारांची रक्कम चोरीला गेली. - 3 ऑक्टोबर - मनसरमधील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटर मधून तब्ब्ल 19 लाख 90 हजाराची रक्कम चोरीला गेली.
या सर्व घटनांमध्ये विविध बँकांचा तब्ब्ल 30 लाख 75 हजार रुपयांचा नुकसान झालं आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा जिल्हा असलेला नागपूर सध्या एटीएम फोडून किंवा कापून बँकांची म्हणजेच सामान्य जनतेची रक्कम चोरण्याचं केंद्र बनलं आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे.