Dhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल
Dhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येला ३५ दिवस उलटूनही अद्याप एक आरोपी फरार आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरु केले आहे. धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह पोलीस धनंजय देशमुख यांना करत आहेत. तर दुसरीकडे धनंजय देशमुखांच्या पाठोपाठ सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) देखील पाण्याच्या टाकीवर चढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पाण्याच्या टाकीखाली फायरब्रिगेडची गाडी देखील बोलावण्यात आली आहे.
धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीच्यावर जाऊन बसले आहेत. पोलिसांनी पाण्याच्या टाकीवर जाण्यासाठी तयारीही केली होती. मात्र, धनंजय देशमुखांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीचा शिडी काढून टाकली. त्यामुळे पोलिसांवर खालीच हतबलपणे उभे राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. मनोज जरांगे आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांनी धनंजय देशमुख यांची समजूत काढत त्यांना पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, धनंजय देशमुख मागे हटायला तयार नाहीत.