नागरिक म्हणून अधिकार मागा, धर्माच्या नावावर नको; केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान
वास्तविक पाहता, भारत हे एक कुटुंब असून प्रत्येक धर्म केवळ शांतता आणि सौहार्दाची शिकवण देतो, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी केले.
Nagpur News : नागरिकांनी संविधान वाचावे, तेव्हाच आपल्या अधिकारांची जाणीव होईल. भारत देश कुटुंबाप्रमाणे आहे व या कुटुंबाचा पाया मजबूत आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. मात्र, त्या अधिकारांची मांगणी नागरिक म्हणून करा, धर्माच्या नावावर नव्हे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान (Kerala Governor Arif Mohammad Khan) यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, तसेच ह्युमॅनिटी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. याअंतर्गत 'देशाच्या प्रगतीसाठी विविध धार्मिक समुदायांमध्ये शांतता व सद्भावनेची गरज' या विषयावर राज्यपाल आरीफ खान यांनी मार्गदर्शन केले.
राज्यपाल म्हणाले...
- भारत देश एका कुटुंबाप्रमाणे आहे.
- देशाच्या संविधानाने प्रत्येकाचे अधिकार निश्चित केले आहेत.
- देशाची मूलभूत शांतता ही त्या देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे.
- आपल्या इच्छांना अनियंत्रित होऊ देऊ नका
ते म्हणाले, धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. धर्माच्या नावावर कोणीही फूट पाडण्याचा प्रयत्न करु नये, कोणी असे करत असेल तर त्याला आपण सर्व एक आहोत. हे आवर्जून सांगा. इंग्रजांनी आपल्यात फूट पाडली. वास्तविक पाहता, भारत हे एक कुटुंब असून प्रत्येक धर्म केवळ शांतता आणि सौहार्दाची शिकवण देतो.
नांदणारी शांतता प्रगतीचा आधार
संविधानाने प्रत्येकाचे अधिकार निश्चित केले आहे. प्रत्येकाला समान अधिकार प्राप्त आहेत. या देशात कोणत्याही व्यक्तीवर धर्म, जात, संप्रदायाच्या आधारावर भेजभाव होणार नाही. मात्र याची जाणीव संविधान वाचल्याशिवाय होणार नाही. कोणत्याही देशात नांदणारी शांतता ही त्या देशाच्या प्रगतीचा आधार असते. जिथे शांतता आहे, तोच देश प्रगती करतो. आपसात प्रेम आणि बंधुभाव जोपासल्यानेच शांती प्रस्थापित होते.
धार्मिक ग्रंथातील अर्थ समजून घ्या!
कोणत्याही धार्मिक ग्रंथावर नजर टाकल्यास मनुष्य आणि प्राण्यांशी एकात्मतेचे नातेसंबंध निर्माण करावे, हाच संदेश या सगळ्यांच्या मुळाशी दडलेला आहे. मात्र आजही हा संदेश आपण समजू शकलेलो नाही. धर्माचा सर्वाधिक वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला जातो. अशा लोकांपासून सावध रहा. चाकूचा वापर भाजी कापण्यासाठी आणि खिसे कापण्यासाठीही होतो. त्यामुळे तुम्ही आपल्या धर्माचा वापर कसा करता, याला अधिक महत्त्व आहे, असे आरिफ मोहम्मद खान म्हणाले.
इतर महत्त्वाची बातमी