Amazon : अॅमेझॉन कंपनीची कोट्यवधींनी फसवणूक, बनावट आयडीद्वारे सायबर गुन्हेगारांनी लावला चुना
फसवणुकीची रक्कम 10 ते 15 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज असल्याने घटनेचा तपास गुन्हे शाखेची आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर पथक मिळून करीत आहेत.
नागपूरः सायबर गुन्हेगारांनी सामान्य नागरिकांसह ई-कॉमर्स कंपन्यांकडे आता आपला मोर्चा वळविला आहे. यापूर्वीही काही प्रकरण समोर आले आहेत, मात्र नागपुरात पहिल्यांदाच असे प्रकरण पुढे आले आहे. सायबर गुन्हेगारांनी अॅमेझॉन कंपनीची बनावट आयडी बनवून विक्री आणि खरेदीच्या नावावर कंपनीला 3 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. एमआयडीसी पोलिसांनी हिंगणा मार्गावरील अॅमेझॉन ट्रांस्पोर्टेशन सर्व्हीस प्रा. लि. चे व्यवस्थापक हेमंत पाखोडे (32) च्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. मात्र फसवणुकीची रक्कम 10 ते 15 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज असल्याने घटनेचा तपास गुन्हे शाखेची आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर पथक मिळून करीत आहेत.
5,731 वस्तू मागवल्या
सायबर गुन्हेगारांनी 9 ते 16 एप्रिल 2022 दरम्यान ही फसवणूक केल्याचा अंदाज आहे. ठकबाजांनी सर्वप्रथम ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवर विक्रेत्यांच्या नावावर आयडी बनवली. या माध्यमातून वेगवेगळे उत्पादनांची विक्री सुरू केली. सोबतच ग्राहकांच्या नावावरही आयडी तयार करण्यात आली आणि कंपनीच्या नावाची नोंदणी केली. या बनावट आयडींच्या माध्यमातून कंपनीकडून 5,731 वेगवेगळ्या वस्तू मागवण्यात आल्या. सर्व वस्तू मागवताना 'कॅश ऑन डिलिव्हरी'चा पर्याय निवडला होता. मात्र प्रत्यक्षात या वस्तूंची डिलिव्हरी झालीच नव्हती, मात्र कंपनीला वस्तू संबंधित व्यक्तीला मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पाठविलेल्या वस्तूंमध्ये बिघाड किंवा इतर कारणे सांगून 'ऑर्डर' कॅन्सल करण्यात आले. जेव्हा ऑर्डरच डिलिव्हर झाले नव्हते तर परत करण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही आरोपींनी अॅमेझॉनच्या 'ऑटोमॅटिक रिफंड' प्रणालीचा उपयोग करून पैसे आपल्या खात्यात जमा करून घेतले.
Maharashtra Legislative Council : शिवसेनेचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नाराज
वाढू शकतो आकडा
आतापर्यंतच्या तपासात 3 कोटी रुपयांची फसवणूक पुढे आली आहे. मात्र ही रक्कम 10 ते 15 कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सतत ऑर्डर परत आणि पैसे रिफंड होत असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि तपासात फसवणूक होत असल्याचे समजले. अशाप्रकारे यापूर्वीही कंपनीची फसवणूक झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली. गुन्हे शाखेने प्राथमिक तपासानंतर एमआयडीसी ठाण्यात गुन्हा नोंद केला. बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तूच मागवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महागडे फोन ऑर्डर करण्यात आले ज्यामुळे रिफंडची रक्कमही अधिक असायची.
आंतरराज्यीय टोळी असल्याचा संशय
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अॅमेझॉन आपल्या प्लेटफॉर्मवर वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी कंपन्यांची नियुक्ती करतो. काही विक्रेते स्वत:च प्रोडक्ट डिलिव्हर करण्याचा करार कंपनीशी करतात. या फसवणुकीत कुरिअर कंपनीत काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. या कामात आंतरराज्यीय टोळीचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि मध्यप्रदेशात अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकरण पुढे आले आहेत. अनेक टोळ्या पोलिसांच्या हातीही लागल्या. पोलिस अशा टोळ्यांची माहिती गोळा करीत आहेत. आरोपींवर फसवणुकीसह गुन्हेगारी षडयंत्र आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ज्या-ज्या क्रमांकावरून आयडी बनविण्यात आली होती, त्या क्रमांकाची चौकशीही केली जात आहे.