Chandrashekhar Bawankule : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असं म्हणून अजितदादांनी मोठा पराक्रम केला : चंद्रशेखर बावनकुळे
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असं म्हटले म्हणून महाराष्ट्राची जनता पेटणारच. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना काहीही म्हणणार मग भाजप कशी गप्प बसणार, असंही पुण्यात झालेल्या आंदोलनाबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar : छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणणे ठीक आहे. मात्र ते धर्मवीर नाहीत असं म्हणणं, आणि अजूनही ते त्यावर ठाम आहेत असे म्हणून अजूनही अजित पवार यांची मुजोरी सुरुच आहे. अजित पवार यांच्या दबावामुळेच कार्यकर्ते मुजोरी मान्य करतात. अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असं म्हणून मोठा पराक्रम केला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.
पुढे बावनकुळे म्हणाले, 'पक्षाकडून सांगण्यात आल्यामुळे पुण्यात पवार यांचं स्वागत करण्यात येत आहे. उत्स्फूर्तपणे होत नाही. अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असं म्हणून मोठा पराक्रम केला आहे. म्हणून स्वागत केलं जात आहे. मात्र अशा पराक्रमातला लोक निवडणुकीत योग्य जागा दाखवतील असेही यावेळी ते म्हणाले. अजित पवार (Ajit Pawar) विरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन झाले आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असं अजित पवारांनी म्हटलं म्हणून महाराष्ट्राची जनता पेटणार नाही का? तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना काहीही म्हणणार मग भाजप कशी गप्प बसणार, असंही ते म्हणाले.
भुजबळांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्षनेते पदावर
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, "छगन भुजबळ बोलले शरद पवार जाणता राजा आहेत. शरद पवार यांच्या कामाबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र या जगामध्ये फक्त एकच जाणता राजा आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असे बोलून छगन भुजबळ यांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्ष नेते पदावर आहे. म्हणून आपले गुण वाढवण्यासाठी, त्यांच्या नजरेत नंबर वन राहण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी भुजबळ शरद पवार यांना जाणता राजा म्हणत असावेत, असेही बावनकुळे म्हणाले.
जितेंद्र आव्हाड नौटंकी आहेत, स्टंटबाज
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) औरंगजेबाबद्दल सहानुभूती व्यक्त करतात. दुसऱ्या दर्ग्याचे दर्शन करताना खोटे बोलून बावनकुळे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेत असल्याचं विधान करतात. महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जे काही होत आहे ते योग्यच आहे. जितेंद्र आव्हाड नौटंकी आहे, स्टंटबाज आहेत, आपल्या मतदारसंघातलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी असे वक्तव्य करत राहतात. त्यासाठी ते महाराष्ट्राच्या इतिहासालाही बदलून टाकतात. हिंदुत्वाचा विचार मांडणारा वर्ग कधीच जितेंद्र आव्हाड यांचे समर्थन करु शकत नसल्याचेही यावेळी ते म्हणाले.
ही बातमी देखील वाचा...