Nagpur Police : एकीकडे वाढती गुन्हेगारी तरी नागपूर पोलीस आयुक्तालय सलग दुसऱ्या वर्षी राज्यात 'बेस्ट'
नागपूर गुन्हेगारी नियंत्रणात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या आणि गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केल्याबद्दल नागपूर पोलीस आयुक्तालयाला राज्यातील सर्वोत्कृष्ट युनिटचा (2021) मान मिळाला आहे
Nagpur News : एकीकडे शहरात नियमित गँगवार होत असून यातून खुनासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत तर दुसरीकडे वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण नसल्याने रस्ते अपघातात निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. तरी देखील नागपूर गुन्हेगारी नियंत्रणात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या आणि गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केल्याबद्दल नागपूर पोलीस आयुक्तालयाला राज्यातील सर्वोत्कृष्ट युनिटचा (2021) मान मिळाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा सन्मान मिळाल्याने शहर पोलीस (Nagpur Police) दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पोलीस विभागाकडून पोलीस आयुक्त आणि अधीक्षकस्तरावर दरवर्षी उत्कृष्ट काम करण्याऱ्या युनिट्सची 'निवड केली जाते. ही निवड 'अ' आणि 'ब' वर्गात विभागली आहे. एका वर्षांत सहा हजार शंभरपेक्षा कमी गुन्ह्याची नोंद करणाऱ्या घटकांचा समावेश 'अ' वर्गात करण्यात आला आहे. 'ब' श्रेणीमध्ये वर्षभरात 6 हजार 100 हून अधिक गुन्ह्यांची नोंद करणारे युनिट्स आहेत. नागपूर पोलीस आयुक्तालयाचा समावेश 'ब' श्रेणीत आहे. राज्य पोलिसांच्या 23 युनिट्सचा या श्रेणीत समावेश करण्यात आला होता. सर्वोकृष्ट पोलीस युनिट म्हणून नागपूर पोलीस आयुक्तालयाने प्रथम क्रमांक पटकावला. पुणे शहर पोलीस आयुक्तालय दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील कार्य विचारात घेण्यात आले. यात सर्व युनिट्सच्या कार्यपद्धती, गुन्ह्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उचललेली पावले यांचा विचार करण्यात आला. "अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने हा मान मिळाला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे. भविष्यातही असेच सहकार्य अपेक्षित आहे," अशी भावना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली.
यासाठी मिळाला नागपूर पोलीस दलाला पुरस्कार
- शहर पोलिसांनी गुन्हे रोखण्यासाठी अनेक पावले उचलली
- खुनाच्या घटनांमध्ये घट
- मोक्का, एमपीडीए अंतर्गत विक्रमी कारवाई
- अंमलीपदार्थ तस्करांविरोधात व्यापक मोहीम.
ऑटो अपघातात दोघांचा मृत्यू
निलज येथून नागपूरला परत जात असलेल्या तीनचाकी ऑटोला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ऑटोचालकासह त्याच्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय मार्गावरील थुटानबोरी (पुनर्वसन) शिवारात हा अपघात झाला. सय्यद मुबारक अली (वय 44 वर्षे) रा. मोठा ताजवारा, नागपूर व आलोक भोलाप्रसाद बघेले (वय 32 वर्षे) रा. सहकार्यनगर, नागपूर अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ऑटोचालक सय्यद व त्यांचा सहकारी आलोक हे दोघेही त्यांच्या शिक्षक मित्राला चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे सोडून देण्यासाठी तीनचाकी ऑटो क्र. MH 49 AR 2840 ने रात्री नागपूरहून निघाले होते. दरम्यान, भिवापूरलगतच्या निलज फाटा परिसरात पोहचल्यानंतर ऑटोतील शिक्षक मित्राला त्यांच्या गावाकडील परिचित मिळाल्याने ते त्यांच्या वाहनाने पुढे सिंदेवाहीला निघाले. त्यामुळे सय्यद व आलोक आपल्या ऑटोने निलजवरुन नागपूरकडे परतीच्या प्रवासाला लागले. दरम्यान, राष्ट्रीय मार्गावरील थुटानबोरी (पुनर्वसन) शिवारात भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने ऑटोला जबर धडक दिली. अपघात इतका भयावह होता की, ऑटोच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला. चालक सय्यद ऑटोच्या आत अडकलेले होते. तर आलोक रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात हलवले, मात्र, तत्पूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
ही बातमी देखील वाचा...