(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cotton : कापसासाठी नव्हे तर रुईसाठी प्रति किलो हमीभाव जाहीर करा, शेती तज्ज्ञांची मागणी
शेती, शेतकरी, कापूस, हमीभाव, नागरुई साठी प्रति किलो हमीभाव जाहीर करा अशी मागणी शेतीतज्ज्ञ विजय जावंधिया ( Vijay Jawandhiya) यांनी केली आहे.
Cotton News : कापसासाठी (Cotton) नव्हे, तर रुई साठी प्रति किलो हमीभाव जाहीर करा अशी मागणी शेतीतज्ज्ञ विजय जावंधिया ( Vijay Jawandhiya) यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून नुकतंच विविध पिकांसाठी हमीभाव जाहीर झाले आहेत. त्यानंतर विदर्भातील शेतीतज्ज्ञांनी कापसासाठी प्रति क्विंटल हमीभावाऐवजी अमेरिकेच्या धर्तीवर रुईसाठी प्रतिकिलो हमीभावाची मागणी केली आहे. यामुळं शेतकऱ्यांचा जास्त आर्थिक फायदा होईल.
रुई उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
केंद्र सरकारने नुकतेच विविध पिकांसाठीचे हमीभाव जाहीर केले आहे. यामध्ये कापसासाठी प्रतिक्विंटल सहाशे वीस रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळं आता कापसाचा हमीभाव हा प्रति क्विंटल सात हजार रुपये झाला आहे. मात्र, शेतीतज्ज्ञांनी त्याबद्दल असमाधान व्यक्त केलं आहे. सरकारनं कापसाला प्रति क्विंटल हमीभाव देण्याऐवजी रुई (कॉटन लिंट ) साठी प्रति किलो हमीभाव जाहीर केले पाहिजे अशी नवीन मागणी केली आहे. शेतकरी संघटनेचे नेते आणि कापसाबद्दलाचे तज्ज्ञ विजय जावंधिया यांच्या मते गेले अनेक वर्ष कापसामधील रुई ( कॉटन लिंट) आणि सरकी-बिनोला (कॉटन सीड ) यासाठी एकत्रित पद्धतीने प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केले जातात. मात्र, गेल्या काही वर्षात शेती क्षेत्रातील नवीन संशोधनामुळं आता कापसाचे अनेक नवीन वाण जास्त रुई उत्पादन देऊ लागले आहेत. त्यामुळं केंद्र सरकारकडून अजूनही कापसामधील रुई आणि सरकी यासाठी एकंदरीत प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केले जात असल्यामुळे जास्त रुई उत्पादन देणाऱ्या वाणाला प्रोत्साहन मिळत नाही. तसेच जास्त रुई उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे ही आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारनं अमेरिका आणि इतर अनेक देशांच्या धर्तीवर रुईला प्रति किलो दर देणे सुरू केल्यास कापसाच्या बाजारात रुई आणि सरकी बिनोला यांचे दर वेगवेगळे होऊन त्यांचे व्यवहारही वेगवेगळ्या पातळीवर होतील. याचा शेतकऱ्यांना जास्त नफा मिळेल असं कृषी तज्ज्ञांना वाटत आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली
शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतजमीनीची नांगरणी, वखरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यंदा हवामान खात्याच्या अंदाजनुसार एल निनोचा प्रभाव वाढून त्याचे दुष्परिणाम म्हणून पाऊस कमी किंवा लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच कापसाच्या दरात सारखीच चढ उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : यंदा एल निनोचा प्रभाव, मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही; वाचा नेमकं काय म्हणतायेत तज्ज्ञ