Nagpur News : मनपाकडून परवाना शुल्क वसुलीसाठी मालमत्तांवर टाच; रामदासपेठेतील 'बोन्साय' इमारतीवर जप्ती
'मालमत्ता कर अभय योजने'अंतर्गत शास्तीची रक्कम माफ करुन मुळ रक्कम भरण्याची मुभा अनेकवेळा थकबाकीदारांना देण्यात आली. तरी ज्यांनी याचा लाभ घेतला नाही अशा सर्व थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे
Nagpur News : थकबाकी वसुलीसाठी मनपाने फास आवळायला सुरुवात केली असून, रामदास पेठेतील एका बाह्य एजन्सीच्या मालकीची असलेली 'बोन्साय' नावाच्या इमारतीवर जप्ती आणली. या एजन्सीवर 6 कोटींची थकबाकी होती. मनपाच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या 550 बॅनर फलकांवर जाहिरात प्रदर्शनासाठी या एजन्सीने अधिकार देण्यासाठी निविदा काढल्या होत्या. या निविदेत अनेक कंपन्यांनी भाग घेतला होता, अशी माहिती उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.
3 वर्षाचे कंत्राट
निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या यश आऊटडोअर्स आणि सुयश मार्ट प्रा. लिमीटेड या कंपनींवर 1.15 कोटीची अधिकची बोली लावून 10 मे, 2018 रोजी निविदा प्राप्त करण्यात आली होती. निविदेच्या अटीनुसार कंपनीकडे 37.35 लाख रुपयाचा तिमाही हफ्ता मनपाच्या तिजोरीत जमा करणे बंधनकारक होते. निविदा प्राप्त झाल्यानंतरही कंपनीने पहिल्या तिमाहीत आठवडयात पैसे व सुरक्षा निधी मनपाकडे जमा केले होते. त्यानंतर मात्र कुठलाही पैसा जमाच केला नाही. त्यानंतरही गेल्या 3 वर्षापासून 550 बॅनर्सचा सर्रास उपयोग सुरुच होता.
2.39 कोटीची डिमांड
कंपनीवर दीर्घकाळापासून थकबाकी होती. 2020मध्येच कंपनीवर 2 कोटी 39 लाख 55 हजार 273 रुपये एवढी डिमांड नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतरही कंपनीने कुठलाही निधी जमा केला नाही. याबाबत मनपाने अनेकदा कंपनीला आठवणही करुन दिली होती. कंपनीकडून व्याजासह थकबाकी वसूल करायची असल्याने महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमानुसार पुन्हा कारवाई प्रस्तावित करण्यात आली. थकबाकी जमा न केल्याने मंगळवारला मनपाने कंपनीच्या स्थावर मालमत्ता असलेल्या बोन्सायवर जप्तीची कारवाई पूर्ण केली.
थकबाकी वसुलीसाठी मनपा आक्रमक
नागपूर महानगरपालिकेसाठी मालमत्ता कर हे महत्त्वाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपैकी एक आहे. मात्र शहरातील मालमत्ता कर वसुलीबाबत मनपा आधी उदासिन असल्याने आणि प्रशासनावर राजकीय दबाव येत असल्याने ही थकबाकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात गेली आहे. त्यामुळे आता प्रशासन वसुलीसाठी आक्रमक दिसून येत आहे. यापूर्वी दरवर्षी मालमत्ता कर अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील शास्तीची रक्कम माफ करुन मूळ रक्कम भरण्याची मुभा अनेकवेळा थकबाकीदारांना देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधींची शास्ती मनपाने माफही केली. तरी ज्यांनी याचा लाभ घेतला नाही अशा सर्व थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मनपातर्फे मालमत्तेवर जप्ती करण्यात येत आहे.
ही बातमी देखील वाचा...