Nagpur Violence : उपराजधानीत तणाव पण शांतता; नागपूर हळूहळू पूर्वपदावर, आज काय सुरू, काय बंद?
Nagpur Violence : नागपुरात सोमवारी दोन गटात उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या घटनेने राज्याची उपराजधानी हादरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.

Nagpur News : नागपुरात सोमवारी दोन गटात उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या घटनेने राज्याची उपराजधानी हादरली आहे. शांतताप्रिय अशी ओळख असलेल्या शहरात कधी नव्हे ते ऐवढया मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Nagpur violence) उफाळल्याची घटना घडली असून सध्या या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. सध्या नागपूरमध्ये तणाव पूर्ण शांततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.
मात्र नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागातील शाळा आजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरीकडे, सध्या तरी नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नसल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील काही भागात जी संचारबंदी लागू करण्यात आली आहे ती अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे. तर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदीमध्ये ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका परिसरातील नागरिकांना बसत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
संचारबंदी कायम, 200 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
नागपूर पोलिसांच्या तीन झोन अंतर्गत अकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आजही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील 200 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतलेला आहे. मात्र सकाळी विद्यार्थ्यांना मेसेज उशिरा पोहोचल्याने अनेक विद्यार्थी शाळेमध्ये येऊन आल्या पावली परत जात आहेत. तर नागपूरच्या महाल भागातील हिंसाचार ग्रस्त भागात सोमवारच्या रात्री ज्या वस्त्यांवर हल्ला करण्यात आला ते हल्लेखोर परत त्या भागात येऊ नये यासाठी तेथील नागरिकांनी रात्रीच्या सुरक्षेसाठी पब्लिक बॅरिकेटिंग केल्याचे पाहायला मिळाले आहे.
11 मार्गावरील बस संचालन पूर्णपणे बंद; 40 बस फेऱ्या प्रभावित
नागपुरातील महाल भागात झालेल्या तणावामुळे महापालिका परिवाहनाच्या 22 मार्गावरील 75 बसेसचे संचालन प्रभावित झाले आहे. यात 11 मार्गावरील बसेसचे संचालन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून 11 मार्ग हे डायव्हर्ट करण्यात आले आहेत. पोलिसांनी कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ज्या भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे त्यामुळे बस संचालन होऊ शकणार नाही. परिणामी अकरा मार्गावरील बस संचालन पूर्णपणे बंद असल्याने 40 फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत. तर परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच बसेसचे संचालन पूर्ववत होईल, असे मनपाच्या परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
इतवारी, गांधीबाग भागातील व्यापाऱ्यांचे म्हणणे काय?
कायदासुव्यवस्थेसाठी पोलिसांना हिंसाचार प्रभावित भागातील बाजापेठे बंद ठेवणे गरजेचे वाटत असेल तर त्याला आमचे समर्थन आहे. अशी भूमिका नागपूरच्या इतवारी, गांधीबाग भागातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हिंसाचार प्रभावित महाल , इतवारी , गांधीबाग भागात दिवसाला 250 कोटीच्या व्यवसाय होतो. तो संचारबंदीमुळे ठप्प आहे. त्यातच मार्च एन्डिंग आल्यामुळे संचारबंदीची गरज नसेल तर बाजापेठ उघडण्याची सूट द्यावी, अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे.
हे ही वाचा
























