वरळीकरांना विश्वासात न घेता म्हाडा-टाटाचं बांधकाम सुरु
वरळी बीडीडी चाळ क्रमांक 28, 29 आणि 31 मध्ये असणाऱ्या पटांगणांत सॅम्पल फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. यासाठी म्हाडा -टाटाच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं स्थानिकांशी बातचीत न करता थेट मोजमाप करायला सुरुवात केली.
मुंबई : गेली अनेक वर्ष रखडलेला वरळी बीडीडी चाळीचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. मात्र या प्रकल्पामधील विघ्न कमी होण्याचे नाव घेत नाही. रहिवाशी आणि लोकप्रतिनिधीनी वरळी बीडीडी चाळ क्रमांक 7 व 8 येथील उद्यानांची जागा म्हाडाला सॅम्पल फ्लॅट बांधण्यासाठी सुचवली गेली आहे. असं असतानाही प्रकल्पासाठी उभारलेल्या बीडीडी चाळ क्रमांक 27/28 च्या जवळील आपल्या ऑफिस जवळच सॅम्पल फ्लॅट उभारण्याचा अट्टाहास म्हाडा आणि टाटा अधिकाऱ्यांकडून सुरु आहे.
वरळीकरांना विश्वासात न घेता सरळ मोजमाप सुरु केल्याने त्यांना ठिकठिकाणी विरोध होताना दिसत आहे. तीन ते चार जागांवर विरोध झाल्यानंतर म्हाडा-टाटाचा मोर्चा आता वरळीच्या पोलीस वसाहतीकडे आला आहे. पण इकडेही स्थानिकांना विश्वासात न घेतल्यामुळे विरोध होताना दिसत आहे. वरळी बीडीडी चाळ क्रमांक 28, 29 आणि 31 मध्ये असणाऱ्या पटांगणांत सॅम्पल फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. यासाठी म्हाडा -टाटाच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं स्थानिकांशी बातचीत न करता थेट मोजमाप करायला सुरुवात केली. अचानक जमा झालेली गर्दी पाहून स्थानिकांनी विचारपूस केली असता याठिकाणी उद्यापासून काम सुरु होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. या तीन इमारतींच्या पटांगणांत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ खेळले जातात, तसेच मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जातात.मात्र कोणतीही माहिती न देता सुरु केलेल्या कामामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप निर्माण झाला आहे. मुंबईत पार्किंगची समस्या एवढी मोठी असताना उद्या म्हाडा-टाटाच काम सुरु झालं तर दंड भरायचा कुणी, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला.
टाटाचे वरिष्ठ अधिकारी मिलिंद कुलकर्णी यांनी माहिती देताना कोणीही विरोध करु नये, प्रत्येक नागरिकांची समजूत काढली जाईल, असं मत व्यक्त केलं आहे. तर नागरिकांचा विरोध असेल तर सॅम्पल फ्लॅटसाठी पर्यायी जागी निवडली जाईल, असं मत म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी व्यक्त केलं.