जळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वछतागृहात कोरोनाबाधिताचा मृत्यू; कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे हायकोर्टाचे आदेश
स्वछतागृहात कोविड रुग्णाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची राज्य सरकारची माहिती, तर पुढील सुनावणीत शवविच्छेदनाचा अहवाल सादर करण्याचा हायकोर्टाचा आदेश

मुंबई : जळगावच्या सिव्हिल रुग्णालयात कोरोनार उपचार घेत असलेल्या 82 वर्षीय महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळून आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हायकोर्टानं त्या महिलेच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शवविच्छेदन अहवाल पुढील सुनावणीवेळी कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
कोरोनानं ग्रस्त एक 82 वर्षीय वृद्ध महिला जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत होत्या. 2 जूनला त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी त्यांचा मृतदेह त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळून आला. कोविड रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना राज्य तसेच केंद्र सरकारने आखून दिलेली नियमावली अंमलात आणावी अशी मागणी करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
आशिष शेलार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी आहे. त्यावेळी जळगाव शासकीय रुग्णालयातील हा प्रकार हायकोर्टाच्या निर्दशनास आणून देण्यात आला. हा प्रकार अत्यंत भयावह असून यामुळे आपल्याला धक्का बसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केलं. आठ दिवसांनी मृतदेह मिळाल्यानं कदाचित उपासमार झाल्यामुळेही हा मृत्यू झालेला असू शकतो अशी शंकाही हायकोर्टानं व्यक्त केली.
राज्य सरकारच्यावतीनं बाजू मांडताना हायकोर्टाला सांगण्यात आले की या प्रकरणी शासनाकडून चौकशी सुरू आहे. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी 5ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली तसेच सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहे.
VIDEO : Jalgaon Corona | स्पेशल रिपोर्ट | जळगावातील नागरिकांचा कोरोना विरोधात यशस्वी लढा























