(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Prabhu : शिंदे गटाचे अनेक वार परतावले, सभागृहात वकिलांना भिडले, ठाकरेंचे निष्ठावान सुनील प्रभू पात्र
Shiv Sena MLA Disqualification Case: एकेकाळी खा. गजानन कीर्तीकर यांचे पीए म्हणून काम करणारे सुनील प्रभू नंतर मुंबईचे महापौर आणि दोन वेळा आमदार झाले. त्यांच्या आमदारकीचा फैसला झाला असून ते पात्र ठरलेत.
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाचे वकील आणि ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी प्रश्नांचा भडिमार करत होते आणि समोर होते ते ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू. मला इंग्रजी लिहिता वाचता येतं, पण मी मराठीमध्ये कॉन्फिडन्ट आहे असं प्रभूंनी ठणकावून सांगितलं आणि जेठमलानींच्या प्रत्येक बाऊंसरवर षटकार मारला. दिंडोशीमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले सुनील प्रभू हे आता पात्र ठरले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) त्यांना पात्र ठरवलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यांच्यासोबत ठाकरेंचा एकेक आमदार गुवाहाटीला जाऊ लागला. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरे गटाची गळती काही थांबत नव्हती. अगदी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अतिशय जवळचे असणारे आमदारांनीही शिंदे गटाची वाट धरली. मात्र अशाही स्थितीत आमदार सुनील प्रभूंनी ठाकरेंची साथ सोडली नाही आणि निष्ठा काय असते याची प्रचिती दिली. सुनील प्रभू हे आता 'मातोश्री'च्या गोटातले नेते मानले जातात.
कोण आहेत सुनील प्रभू? (Who Is Sunil Prabhu)
सुनील प्रभू हे मुंबईतील गोरेगावजवळील दिंडोशी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. सुनील प्रभू यांनी 1992 साली शिवसेनेचे नेते आणि आताचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे पीए म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर त्यांनी 1997 साली आरे कॉलनीतून महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले. त्यानंतर सलग चार वेळा त्यांनी महापालिकेत निवडून येऊन काम केलं. त्यांनी सहा वर्षे शिवसेनेचे सभागृह नेता म्हणून काम केलं.
सुनील प्रभू यांना 2012 ते 2014 या कालावधीत मुंबईच्या महापौरपदी काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी आपल्या भाषणांनी महापालिका गाजवली आणि आपल्या कार्याची छाप सोडली.
आमदारकी जिंकली (Sunil Prabhu Dindoshi Assembly constituency)
सलग चार वेळा नगरसेवक झालेल्या सुनील प्रभू यांना 2014 साली दिंडोशी मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट मिळालं. त्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारत भाजपच्या मोहित कंबोज आणि मनसेच्या शालिनी ठाकरे यांचा पराभव केला. तर 2019 साली त्यांनी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांचा पराभव करून दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली. या काळात सुनील प्रभू हे 'मातोश्री'च्या आणखी जवळ गेले. त्यामुळे त्यांची शिवसेनेच्या पक्ष प्रतोदपदी निवड झाली.
शिंदेंच्या बंडानंतरही ठाकरेंच्या सोबत (Shiv Sena MLA Disqualification Case)
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकेक आमदार आणी खासदार ठाकरेंना सोडून जात असताना सुनील प्रभू मात्र ठाकरेंच्या सोबत कायम राहिले. शिंदेंच्या शिवसेनेने सुनील प्रभूंची प्रतोदपदावरून हाकालपट्टी करून त्या ठिकाणी भरत गोगावले यांची निवड केल्याचं जाहीर केलं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचीच व्हिप म्हणजे प्रतोद म्हणून निवड योग्य ठरवली.
मराठी, गुजराती आणि उत्तर भारतीय अशी समसमान संख्या असणाऱ्या या मतदारसंघावर भाजपचा सुरुवातीपासूनच डोळा आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आणि भाजपच्या रडारवर सुनील प्रभू आहेत. आता त्यांची आमदारकी पात्र ठरल्यानंतर ते नव्या उर्जेने पुन्हा कामाला लागतील यात शंका नाही.
ही बातमी वाचा: