Western Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर आता मेट्रोप्रमाणे तिकीट अन् सुरक्षा तपासणी होणार; गर्दी नियंत्रित करण्यासाठी नवीन प्लॅन तयार
Mumbai Western Railway: मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Mumbai Western Railway मुंबई: मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. रेल्वेकडून पश्चिम रेल्वेच्या 12 स्थानकांवर (Western Railway) पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी संबंधित स्थानकांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आली आहे. या यादीमध्ये मुंबईतील वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि अंधेरीसह गुजरात विभागातील 9 स्थानकांचा समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
अधिक सुरक्षा आणि स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी आता मेट्रो प्रमाणेच लोकल रेल्वे स्थानकावर देखील नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने त्यासाठी मुंबईतील 3 स्थानकांची नावे रेल्वे बोर्डाकडे पाठवली आहेत. अंधेरी, बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस या स्थानकांवर येत्या काळात प्रवाशांच्या नियंत्रित प्रवेशासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. सध्या तरी हा पायलट प्रोजेक्ट आहे. जर यात यश मिळाले तर मुंबईतील अन्य स्थानकांवर देखील या उपाययोजना करण्यात येतील.
पश्चिम रेल्वेने 12 स्थानकांची नावे पाठवली-
रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध रेल्वे विभागांकडून संभाव्य स्थानकांची यादी मागवली होती. त्यानुसार पश्चिम रेल्वेने 12 स्थानकांची नावे पाठवली असून या प्रकल्पांतर्गत प्रवाशांना मेट्रोप्रमाणे तिकीट तपासणी, सुरक्षा तपासणी आणि प्लॅटफॉर्मवर प्रवेश यासाठी ठराविक मार्गाने जावे लागणार आहे. मेट्रोने प्रवास करताना तिकीट खिडकी आणि प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मात्र पारंपरिक रेल्वे स्थानकांमध्ये अशी सोय नसते.
भविष्यात डेकवरच तिकीट खरेदी-
सध्या मुंबईतील काही स्थानकांवर डेक (Deck) उभारण्यात येत आहेत. भविष्यात या डेकवरच तिकीट खरेदी, सुरक्षा तपासणी आणि नियंत्रीत प्रवेशाची व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या पायलट प्रकल्पामुळे रेल्वे स्थानकांवरील गोंधळ कमी होण्यासह प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
काय होतील फायदे ?
- नियंत्रित प्रवेशामुळे प्लॅटफॉर्मवर होणारी अनावश्यक गर्दी कमी होईल.
- बिनतिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवता येईल.
- नव्या डेकवर तिकीट खरेदी, तपासणी आणि प्रवेशाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
- तिकीट तपासणी आणि सुरक्षा तपासणी अधिक काटेकोरपणे करता येईल, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल.
संबंधित बातमी:



















