ठाणेकरांवर पाण्यासाठी लोन काढण्याची वेळ! खाजगी टँकर्सकडून नागरिकांची लूट
पाण्याच्या टँकरसाठी वीस दिवसात एका कॉम्प्लेक्सने जवळपास एक कोटी रुपये खर्च केलेत. हे वाचून धक्का बसला ना? पण, अशी परिस्थिती ठाणे शहरात आली आहे.
ठाणे : घराची किंमत एक ते दीड कोटी पण त्याच घरात प्यायला एक थेंब पाणी नाही, ही परिस्थिती मराठवाडा किंवा विदर्भातील जिल्ह्याची नसून ठाणे शहरातली आहे. मोठमोठ्या गृहसंकुलात पाण्याविना लोकांना घर सोडायची वेळ आज आलीये. पाण्याच्या टँकरसाठी वीस दिवसात एका कॉम्प्लेक्सने जवळपास एक कोटी रुपये खर्च केलेत. हे वाचून धक्का बसला ना? पण, अशी परिस्थिती ठाण्यात आलीय. ठाण्यातील कोलशेत रोडवरील लोढा अमारा या कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाणी नसल्यामुळे खासगी टँकरच्या पाण्यावर येथील रहिवाश्यांना अवलंबून राहावं लागत आहे. जवळपास पाच ते सहा हजार कुटुंबं या ठिकाणी वास्तव्यास आहेत. प्रत्येकाने कोट्यवधीचे लोन काढून या ठिकाणी घर घेतली आहेत. पण, आता पाण्यासाठीदेखील वेगळं लोन घेण्याची वेळ या राहिवाश्यांवर आली आहे.
ठाणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार ठाण्यात पालिकेचे फक्त 5 टँकर्स तर खासगी केवळ 20 टँकर्स कार्यरत आहेत. पालिका 10 हजार लिटरच्या एका टँकरसाठी 1 हजार रुपये घेते तर खासगी टँकरला पाणी देताना 700 रुपये घेते. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळंच आहे. लोढा अमारा सारख्या एका सोसायटीलाच दिवसाला 100 पेक्षा जास्त टँकर्स लागतात. ते पण 6 हजार रुपये प्रति टँकर या दराने दिले जातात. म्हणजे पूर्ण ठाण्याचा विचार न केलेलाच बरा.
सध्या ठाणे महानगरपालिकेला 485 एमएलडी पाणीपुरवठा होतो, त्यापैकी 110 एमएलडी पाणी स्टेम प्राधिकरणाकडून येते, 65 एमएलडी पाणी मुंबई महानगरपालिका देते, ठाणे महापालिका 200 एमएलडी पुरवते तर उर्वरित 110 एमएलडी पाणी एमआयडीसीकडून पुरवले जाते आणि याच एमआयडीसीच्या जुन्या पाइप लाइनमुळे सध्या ठाण्यात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
एमआयडीसीची पाईप लाईन अतिशय जुनी आहे. ही पाईपलाईन सतत फुटत असते, त्यामुळे वेळोवेळी दुरुस्तीसाठी संपूर्ण पाणीपुरवठा बंद करावा लागतो. सोबतच पाईपलाईन बदलण्याचे काम देखील हातात घेण्यात आले आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे.
यापेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाणे महानगरपालिकेकडे स्वतःचा पाण्याचा एकही स्रोत नाही. मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेप्रमाणे स्वतःचे हक्काचे एकही धरण नाही. गेल्या अनेक निवडणुकांच्या वेळी ठाण्याला हक्काचे शाई नावाचे धरण बांधून दिले जाईल या आश्वासनावर लढल्या गेल्या. त्यात शिवसेना सलग 30 वर्ष निवडून आली. पण आजतागायत हे धरण फक्त कागदावर उभं राहिलं. प्रत्यक्षात ठाणेकरांना ठेंगा मिळाला. अखेर जलसंपदा मंत्री काल ठाण्यात आले आणि गंभीर झालेल्या पाणी प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेला.
ठाण्यातील पाण्याचा प्रश्न इतका गंभीर असूनही त्यावर तोडगा नसल्याने नागरिकांची एक प्रकारे फसवणूक होतेय. विशेषतः महिलांची. जर पाणीच नाही तर नवीन बिल्डिंगला परवानगी देताच कशाला असा प्रश्न गृहिणी विचारात आहेत. इतकी भीषण पाणीटंचाई असून देखील ठाणे महापालिकेच्या म्हणण्यानुसार ठाण्यात पाणीटंचाई नाही. अतिरिक्त पाण्याचा पुरवठा महापालिकेकडे होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातच पाणी नसणे म्हणजे दुर्दैवच म्हणावं लागेल. आणि ही स्थिती फक्त ठाणे महापालिकेची नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची आहे. शहापूर सारख्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तालुक्यात पण वर्षाचे 12 महिने पाणी टंचाई असते. मग 6 महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि विविध ग्राम पंचायत असलेल्या ठाणे जिल्ह्याची काय अवस्था असेल याचा तुम्हीच विचार करा.