राज्यात पुनश्च हरिओम, तर मंदिरातील हरी कुलपात का? वारकरी मंडळाचा प्रश्न
राज्य सरकारने लॉकडाऊन मधील नियम व अटी शिथील करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
मुंबई : संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. यामध्ये देशातील मंदिरांबरोबरच सर्व गर्दीची ठिकणे बंद करण्यात आली होती. गेल्या 3 महिन्यांपासून असणारे लॉकडाऊन आता शिथील करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील छोटी छोटी मंदिरं खुली करावीत, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून मंदिरातील भजन, हरिपाठ, नित्यनियम बंद आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले नियम राज्यातील सर्वच मंदिरांनी पाळलेले आहेत. आता पुनश्च हरिओमचा नारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. यामध्ये पुन्हा सर्व परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी हळूहळू अनेक उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विवाह सोहळे संपन्न होत आहेत. त्यासाठी 50 जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली जात आहे. अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी परवानगी आहे. तर मग मंदिरातील उपासना पद्धती बंद का? किमान छोट्या मंदिरात कीर्तन, भजन करण्यासाठी 25 ते 50 भक्तांना उपस्थित राहण्यासाठी नियम व अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाने केलेली आहे.
नियम व अटी घालून मंदिरं उघडण्याची परवानगी द्यावी महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या दररोज मंदिरांमध्ये नित्यनियम भजन हरिपाठ करणारे लाखो मंडळी लॉकडाऊनमुळे गेली चार महिने अत्यंत अस्वस्थ आहेत. राज्य शासनाने अनेक उद्योगधंदे, हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. तर दुसर्या बाजूला राज्यातील छोट्या छोट्या मंदिरांना मात्र अद्यापही कुलूप लावण्यात आलेलं आहे. राज्य सरकारने ही छोटी मंदिर सुरू करण्याची परवानगी द्यावी. तसेच आरोग्याच्या दृष्टीने व सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने तोंडाला मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटोकाट पालन करुन मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती ती वारकरी मंडळाने केलेली आहे.
हॉटेल, सलून व्यवसायिकांना परवानगी, जिम व्यवसायिकांना का नाही? संघटना आक्रमक
आज अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांना निवेदन सादर करून राज्यातील मंदिर खुली करण्याची मागणी केली.
सरकारने अटी-शर्ती घालून परवानगी द्यावी : ह.भ.प प्रकाश बोधले महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ)
महाराष्ट्रातील लाखो वारकरी आणि भक्त पहाटे आणि संध्याकाळी नित्यनेमाने मंदिरात पुजा करीत असतात. त्याच पद्धतीने भजन हरिपाठ देखील करत असतात. गेल्या तीन महिन्यांपासून हे सर्व लोक मंदिरापासून अलिप्त झालेले आहेत. केंद्र सरकारने आता मंदिरं खुली करण्यासंदर्भात ही सूचना दिलेल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने अद्यापही राज्यातील छोटी छोटी मंदिर खुली केलेली नाहीत. आम्ही दिवसातून दोन वेळा राज्य सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून भजन, कीर्तन आणि हरिपाठ करू इच्छित आहे. याला सरकारने अटी-शर्ती घालून परवानगी द्यावी अशी विनंती आम्ही करत आहोत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून कल्पना दिली : आचार्य तुषार भोसले महाराष्ट्र राज्यात पुनश्च हरिओमचा नारा दिलेला असताना राज्यातील मंदिरांमध्ये असलेल्या हरीला कुलपात का ठेवण्यात आलेलं आहे. असा प्रश्न आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करीत आहोत. राज्यात एका बाजूला मद्याची विक्री केली जाते, हॉटेल लॉजिंग बोर्डिंगना परवानगी दिली जाते. तर छोट्या छोट्या मंदिरांमध्ये नित्य पाठ करण्याची परवानगी का दिली जात नाही, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन याची कल्पना दिली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात बोलून निर्णय घ्यावेत अशी विनंती त्यांना करण्यात आलेली आहे.
Shivsena Meeting | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक, वर्षा बंगल्यावर बैठक