विनायक शिंदे सचिन वाझेंच्या सांगण्यावरुन बार, पबमधून वसुली करायचा; NIA च्या सूत्रांची माहिती
विनायक शिंदे ठाणे आणि नवी मुंबईतील पब आणि बारमधून वसूली करायचा. सचिन वाझे वसुली केलेल्या पैशातून काही रक्कम विनायक शिंदेला देत असत.
मुंबई : मनसुख हिरण हत्या प्रकरणी एनआयएच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी विनायक शिंदेची डायरी एनआयएने त्याच्या घरातून जप्त केली आहे. या डायरीतील नोंदींतून महत्त्वाची माहिती एनआयएच्या हाती लागली आहे, अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे. विनायक शिंदे ठाणे आणि नवी मुंबईतील पब आणि बारमधून वसूली करायचा अशी माहिती एनआयएला मिळाली आहे.
एनआयएने जप्त केलेल्या डायरीतून समोल आलं आहे की, विनायक शिंदे सचिन वाझे यांच्या नावे ठाणे शहरातील 30 बार आणि पबमधून पैशांची वसुली करत होता. या डायरीत त्या बार आणि पबची नावे आहेत आणि त्याच्या नावासमोर दरमहा गोळा होणारी एक रक्कम आहे. यातील बहुतेक पब आणि बार ठाणे शहर आणि नवी मुंबई येथे आहेत.
सचिन वाझे वसुली केलेल्या पैशातून काही रक्कम विनायक शिंदेला देत असत. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कमिशनच्या लोभामुळे विनायक शिंदे सचिन वाझे यांनी रचलेल्या मनसुख हिरण हत्येच्या कटात सामील झाला. विनायक शिंदे 2020 मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यापासून सचिन वाझे यांच्या आदेशानुसार काम करत होता.
मनसुख हिरण यांच्या हत्येच्या कट रचण्याच्या बैठकीला विनायक शिंदे आणि सचिन वाझे उपस्थित
मनसुख हिरण यांच्या हत्येची योजना ज्या बैठकीत आखण्यात आली, त्या बैठकीला सचिन वाझे आणि विनायक शिंदे हे दोघेही उपस्थित होते. असा दावा मंगळवारी राष्ट्रीय तपासयंत्रणा (एनआयए) च्यावतीने विशेष एनआयए न्यायालयात करण्यात आला. तसेच वाझे यांनी हे कारस्थान रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराला मोबाईलवरून फोनही केला असल्याची माहिती एनआयएने न्यायालयाला दिली. त्यामुळे हे कट कारस्थान आणि गुन्ह्यामागील हेतूचा जवळपास उलगडला झाल्याचंही एनआयएनं विशेष न्यायालयाला सांगितलं.